दैनिक स्थैर्य | दि. २२ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
मलटण, ता. फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते, महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक बाळासाहेब अडसूळ व माजी सैनिक चंद्रकांत अडसूळ यांनी आपल्या आईचे सकाळी निधन झाल्यानंतर तिचे अंत्यसंस्कार केल्यानंतर दु:ख बाजूला ठेवत लगेच मतदानाचे कर्तव्य पार पाडले. या त्यांच्या कार्यातून मतदारांपुढे एक आदर्श निर्माण झाला आहे.
अडसूळ बंधूंची आई कै. सुभद्राबाई मल्हारी अडसूळ यांचे दि. २० रोजी पहाटे वयाच्या ९२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. यामुळे अडसूळ कुटुंबीय दुःखात गेले होते. मात्र, मतदान करणे हे आपले मुख्य कर्तव्य समजून अंत्यविधी उरकल्यानंतर लगेचच घरातील सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यामुळे मलटण परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक केले आहे.
यावेळी बाळासाहेब अडसूळ यांनी सांगितले की, आईला मतदान करता आले नाही; परंतु आम्ही दुःख बाजूला ठेवत कुटुंबातील सर्वांनी मतदान केले. कै. सुभद्रा अडसूळ यांचा धाकटा मुलगा चंद्रकांत अडसूळ यांनी सांगितले की, देशासाठी आम्ही आयुष्यातील खूप वर्षे दिली आहेत. एक माजी सैनिक म्हणून मतदानाचे महत्त्व मी जाणतो, म्हणून दुःख बाजूला ठेवून मतदान केले आहे.