मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून गरजू रुग्णांना मोठा आधार; २४ तासांत मदत उपलब्ध

जिल्ह्यात ७ महिन्यांत पावणेसहा कोटींची मदत; रुग्णांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त


स्थैर्य, सातारा, दि. ०७ ऑगस्ट : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष एक विश्वासार्ह आधार ठरत आहे. सातारा जिल्हा कक्षाने मागील सात महिन्यांत ५ कोटी ८७ लाख ९९ हजार रुपयांची भरीव वैद्यकीय मदत वितरित केली असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी दिली आहे.

या योजनेमुळे २४ तासांत मदत मिळत असल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी दिल्या आहेत. देगाव येथील प्रवीण ताटे आणि कसुंबी येथील सावित्री भिलारे यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत तातडीने मंजूर झाली. या मदतीमुळे रुग्णांवर वेळेवर उपचार करणे शक्य झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. आनंद भिलारे या रुग्णाच्या मुलाने सांगितले की, अर्ज केल्यानंतर अवघ्या २४ तासांत आईच्या उपचारासाठी एक लाख रुपये मंजूर झाल्याचा फोन आला, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष कार्यरत असून, पेपरलेस व डिजिटल प्रणालीमुळे मदत मिळवणे सोपे झाले आहे. जिल्हास्तरावरच कक्षांची स्थापना झाल्याने रुग्णांची मंत्रालयातील धावपळ थांबली आहे. या योजनेअंतर्गत हृदय, कर्करोग, अवयव प्रत्यारोपण आणि अपघात अशा २० गंभीर आजारांवर उपचारासाठी मदत केली जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाचे वार्षिक उत्पन्न १.६० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड आणि वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून गरजू रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी संपर्क साधू शकतात.


Back to top button
Don`t copy text!