रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरु व्हावी असे नियोजन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी पायाभूत सुविधांकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. याअनुषंगाने विमानतळाच्या परिसरातील विकास कामांचे सुनियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

रत्नागिरी विमानतळ विकासाबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस परिवहन मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सामान्य प्रशासन विमानचालन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विमानचालन संचालनालयाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, तटरक्षक दलाचे अधिकारी आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोकणातील पर्यटन आणि उद्योग-व्यवसायवाढीसाठी रत्नागिरी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरु होणे आवश्यक आहे. याठिकाणाहून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधांसाठीचे सुनियोजन करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक निधीची उपलब्ध करून देण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात सुरु होणारे हे विमानतळ कोकणच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. परब यांनी पर्यटन व उद्योग वाढीसाठी रत्नागिरी विमानतळ महत्त्वाचे आहे. त्याचा विस्तार आणि विकास यासाठी नियोजन असल्याची माहिती दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी नुकतीच या विमानतळ परिसराला भेट देऊन, तेथील पायाभूत सुविधांसाठी आवश्यक अशी पाहणी केल्याचे तसेच स्थानिकांशी चर्चा केल्याचे सांगितले.

सुरुवातीला विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. कपूर यांनी रत्नागिरी विमानतळाचा विकास व विस्ताराच्या अनुषंगाने जमिनीचे भूसंपादन, विस्तार कामे, विविध सुविधा तसेच आवश्यक निधी यांची माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनीही विमानतळ परिसरातील प्रगतीपथावरील कामांची माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!