
दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । समाजकारण आणि राजकारण यांचा समतोल साधत जनसेवेचा आदर्श उभा करणारे धडाडीचे व्यक्तीमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार गजानन बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, दिवंगत गजानन बाबर यांनी मेहनतीच्या जोरावर राजकारणात स्थान निर्माण केले. नगरसेवक, आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यातून त्यांनी समाजकारणाचा आदर्श उभा केला. कामाच्या धडाडीमुळे आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे अनेकदा त्यांचा आवर्जून उल्लेख होत असे. दिवंगत गजानन बाबर यांचे विकास कामांतील योगदान सदैव स्मरणात राहील.
त्यांच्या कुटुंबियांना दुःखाचा हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, अशी ईश्वर चरणी प्रार्थना. माजी खासदार गजानन बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.