स्थैर्य, मुंबई, दि. २३: विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहोचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी, असे निर्देश दिले आहेत.
आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमींना १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.