स्थैर्य, दि.९: समस्त देशाला सुन्न करणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात केअर युनिटला आग लागून 10 नवजात बाळांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेच्या तातडीने चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, भंडाऱ्यातील घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच, स्थानिक अधिकारी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
भंडारा जिल्हा रुग्णालय येथील गोर-गरीब आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी एक मोठा आधार आहे. या रुग्णालयात आरोग्याच्या सर्वच सुविधांची सोय करण्यात आली. जन्मल्यानंतर नवजात बालकला काही त्रास झाल्यास याच ठिकाणी नवजात केअर युनिटमध्ये ( SNCU ) ठेवण्यात येत असते. इतर रुग्णालयांप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा पालकांना आत जाण्याची परवानगी नसते. आग लागल्यानंतर पालकांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली, तेव्हा पालक आणि कुटुंबियांनी रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली.