दैनिक स्थैर्य | दि. १० जून २०२३ | सातारा |
सध्या दलित बांधवांच्या हत्या सुरू आहेत. या प्रवृत्तीचा तीव्र निषेध करत असून अक्षय भालेराव हत्या, बोतालजी आत्महत्या व इतर अनेक अत्याचारांच्या घटनांविरोधात सातार्यात मोर्चा काढून तीव्र जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या बदलीमागचे नेमके कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
अशोक गायकवाड म्हणाले की, सध्या खैरलांजी सुरू झाले असल्याची परिस्थिती आहे. परंतु, आम्हाला शांती हवी आहे. त्यामुळे आम्ही विचारांची लढाई लढत आहोत.
यावेळी शासकीय अधिकार्यांच्या बदली धोरणावर त्यांनी टिका केली. यावेळी गायकवाड म्हणाले, ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ पुरस्कार मिळालेल्या सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अकरा महिन्यात बदली केली. या बदलीचे कारण प्रशासनाने स्पष्ट करावे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली का केली, हे जनतेला सांगावे. त्यांनी आतापर्यंत पर्यावरण वाचवण्यासाठी, बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केल्याने त्यांची बदली केली असेल तर ते निंदनीय आहे. तुमच्या लॉबिंगसाठी अधिकारी बदलले तर सर्वसामान्य असुरक्षित राहणार आहेत. आमची युती तुमच्यासोबत आहे, म्हणजे काय आम्ही तुमच्या घरी भांडी घासायला नाही. आम्ही एका विचाराने तुमच्यासोबत आलो आहे. त्यामुळे आम्ही काही निर्णय घेतला तर तुम्हाला परवडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कोल्हापुरात दंगल झाली, याबाबत गायकवाड म्हणाले, दंगलीने प्रश्न सुटत नाहीत. दंगलीत सर्वसामान्यांचीच घरे, दुकाने फुटतात. जे आक्षेपार्ह प्रकार करतो, त्याविरोधात प्रशासनाला धारेवर धरून कारवाईची मागणी केली होती.
महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्यामुळे स्थानिक, विद्यार्थ्यांना त्रास होणार असून त्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली. तसेच टोलनाक्यावरून मोठ्या प्रमाणावर टोल वसुली होत असताना त्याप्रमाणात सुविधा मिळत नाहीत. पाच सेकंदात गाडी पास झाली नाही तर टोल द्यायचा नाही, असा नियम असताना दोन-दोन किमीच्या रांगा लागतात. महाबळेश्वरमधील टोलनाका बंद करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.