मुंबईतील गोवर आजार नियंत्रणाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ नोव्हेंबर २०२२ । मुंबई ।  मुंबई महानगरातील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील गोवर साथ नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी यावेळी मुंबईतील गोवर आजाराच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, लसीकरणाच्या अभावी बालकांना गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या भागात गोवरचा उद्रेक होत आहे तेथे तातडीने लसीकरणाची मोहिम मुंबई महापालिकेने हाती घ्यावी. लसीकरणाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी स्थानिक नेते, विविध धर्मगुरू यांची मदत घ्यावी. गोवरची साथ नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ज्या बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

मुंबईत १६४ बालकांना गोवरची लागण झाली असून त्यातील ६१ रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे आयुक्त डॉ. चहल यांनी सांगितले. लसीकरणासाठी ९०० हून अधिक केंद्र सुरू करण्यात आले असून लसीकरणाच्या समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच बालकांना अ जीवनसत्वचा डोस देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!