आता जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ जानेवारी २०२५ | सातारा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय राज्यातील गरजू रुग्णांना त्यांच्याच जिल्ह्यात आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत होते, ज्याचा मुख्य उद्देश गरजू रुग्णांना गंभीर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य पुरविणे हा आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. आता, या सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा शासननिर्णय काढण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कामकाज अधिक सुलभ व पेपरलेस करण्यात येत आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार आहे. याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च टाळता येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार्‍या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत संबंधित जिल्ह्यातील अर्जांची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे, समस्यांचे निराकरण करणे, रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज भरण्यास सहाय्य करणे, आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, जनजागृती आणि प्रसिध्दी करणे यासारखे कार्य हाती घेण्यात येतील. जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे आणि आजारांचे पुनर्विलोकन करून अर्थसाहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करण्यासाठी राज्यातील तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना आर्थिक सहाय्य केले जाते. धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली (चॅरिटी पोर्टल) आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) एकत्रित जोडण्यात येणार आहेत, ज्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक गतिशील आणि सोपी होणार आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने आतापर्यंत राज्यातील हजारो गरजू रुग्णांना जीवनदान दिले आहे. दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत असताना कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधांचा गरजू रुग्णांनी अधिकाधिक प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!