मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील वीर शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शहीद वीरांना आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना प्रकट करून वीर शहीदांसह तसेच हा हल्ला परतवून लावण्यासाठी निकराचा लढा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुंबईवरील हल्ला हा दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा होता, अशी निर्भत्सनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मुंबईवरील हल्ला हा भारताच्या आर्थिक राजधानीवरील हल्ला होता. देशाच्या विकासाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न मुंबईकरांनी उधळून लावला. त्यामध्ये मुंबई पोलीसांनी शौर्याची परिसीमा गाठली. केवळ मराठीच नव्हे तर, संबंध भारतीय मनोधैर्य एकवटले. वीर जवान तुकाराम ओंबळे यांनी निशस्त्र असतानाही क्रूरकर्मा दहशतवाद्याला जेरबंद करण्यासाठी बलिदान पत्करले. पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी गोळ्या झेलून, अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या शौर्य, धैर्य आणि समर्पणासमोर नतमस्तक होण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भ्याड हल्ल्यांना भीक न घालण्याची, आव्हानांवर मात करण्याचे मनोधैर्य आणखी उंचावेल ते पुढच्या पिढ्यांमध्ये विकसित व्हावे यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया. हेच या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आणि निष्पाप बळींना अभिवादन ठरेल,असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!