मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाआरोग्य शिबिरास भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२३ । पंढरपूर । आषाढी वारीत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन रस्ता येथील महाआरोग्य शिबिरास भेट दिली. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थित वारकरी भाविकांना आषाढी एकादशी आणि वारीच्या शुभेच्छा दिल्या. आषाढी वारीत आरोग्य विभागाने वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत व त्यांच्या समुहाचे अभिनंदन केले.

राज्य शासनाने सामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेला प्राधान्य दिले असून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विषयक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात नागरिकांना दीड लाखांऐवजी 5 लाख रुपये एवढे आरोग्य संरक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगतिले.

आरोग्य शिबिरास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वारकरी भाविक आपल्या आरोग्य समस्येची संबंधित आरोग्य कक्षात तपासणी करून औषधोपचार घेत आहेत. डॉक्टरांकडूनही भाविकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून आरोग्य तपासणी केली जाते.

आषाढी वारीत शासनाने आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल भाविकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे.


Back to top button
Don`t copy text!