
दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । मुंबई । लोकमत समूहातर्फे जहांगीर कलादालन येथे आयोजित ‘फोर स्टोरीज’ कला प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.
यावेळी ‘लोकमत’ समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, श्रीमती रचना दर्डा, ‘सर्च’ संस्थेच्या मुख्य वास्तुविशारद जयश्री भल्ला, कलाकार बिना ठकरार, प्रदर्शनाच्या समन्वयक तृप्ती जैन उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रदर्शनाची पाहणी करून चित्राचे कौतुक केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या प्रदर्शनामधील प्रत्येक चित्राला वेगळं महत्त्व आहे. यामधील चित्र व रंग व्यक्त होताना दिसत आहेत. हे आगळे वेगळे चित्रप्रदर्शन असून याद्वारे समाजाला काही देण्याचा उपक्रम निश्चितच अभिमानास्पद आहे असे सांगून या चित्रांच्या विक्रीद्वारे मिळणाऱ्या निधीतून समाजातील गरजूंना मदत करण्याच्या कृतीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

जेव्हा जेव्हा समाजाला गरज भासते त्यावेळेस लोकमत समूहाने पुढाकार घेऊन समाजातील गरजूंना मदत केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या प्रदर्शनातील चित्रांच्या विक्रीद्वारे मिळणारा निधी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे, असे लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी सांगितले.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					 
					