स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२२ । मुंबई । साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चेंबूर येथील उद्यानातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार प्रसाद लाड, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला होता. अण्णा भाऊ हे एक क्रांतीकारी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कार्याला पुढे घेवून जाण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक करायचे आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे घर हे भव्य स्मारक तयार करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात येईल. तसेच मागील काळात आंतरराष्ट्रीय स्मारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबतही राज्य शासन कमी पडणार नाही. महामंडळाबाबतही  तातडीने निर्णय घेतला जाईल. राज्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. आमचे सरकार अस्तित्वात आल्यापासून कमी वेळेत अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. आमचे सरकार हे सर्वांचे असून सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे परिवर्तनवादी चळवळीचे नेते होते. त्यांच्या चळवळीची दखल घ्यावी लागली. लोकशाहिरांचे कार्य परिवर्तन घडवून आणणारे होते. त्यांचे साहित्य 27 भाषांमध्ये भाषांतरित होणे हीच त्यांची ताकद होती. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या घराचे सुंदर स्मारक तयार करण्यात येईल. महामंडळाला चालना देण्यात येईल. प्रलंबित मागण्यांबाबत बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक करण्याची आणि आयोगाच्या शिफारशींना मान्यता देण्याबाबतची कार्यवाही करू. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य पुढे नेण्याकरिता राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीदेखील उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.


Back to top button
Don`t copy text!