सर्वसामान्यांना उभारी देणाऱ्या मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी बँका होण्यासाठी शासन मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । नांदेड । गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची या क्षेत्रातील कामगिरी अभिमानास्पद असून सर्वसामान्य माणसाला उभं करणाऱ्या अशा संस्थांचे बँकेत रुपांतर व्हावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. तसेच यासंदर्भात केंद्र शासनाकडेही पाठपुरावा केला जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयास त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी मंत्री आमदार संजय राठोड, खासदार हेमंत पाटील, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, गोदावरी अर्बन सोसायटीच्या अध्यक्षा राजश्री पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर घुगे, गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, लोककल्याणासाठी एखादी संस्था चालवणे आणि त्यात सातत्य टिकवून ठेवणे हे सर्वांनाच जमत नाही. मात्र गोदावरी अर्बन संस्थेने अवघ्या दहा वर्षात पाच राज्यात विस्तार केला आहे. तो अतिशय अभिमानास्पद असाच आहे. त्यामुळे गोदावरी अर्बन सोसायटी ही पतसंस्था न राहता तिचे बँकेत रूपांतर झाले पाहिजे यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. या संदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करु असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयात ‘घ्या उंच भरारी तुमच्यासोबत गोदावरी’ ही गोदावरी अर्बनच्या कार्याचा आढावा घेणारी 15 मिनिटांची चित्रफित मुख्यमंत्र्यांनी पाहिली. पाच राज्यात विस्तार, 85 शाखा ही संस्थेची कौतुकास्पद कामगिरी पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!