शेतकरी, कामगारांसह सामान्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ३१ जुलै २०२२ । औरंगाबाद । शेतकरी आणि कामगार यांच्यासह सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राज्यातील शासन कटिबद्ध आहे. या सर्व घटकांच्या हितासाठी शासन गतिमानतेने निर्णय घेत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे पंचगंगा उद्योग समूह संचलित श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते  झाले. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास आमदार दादाजी भुसे, उदय सामंत, संदीपान भुमरे, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, बाळासाहेब मुरकुटे, सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज, वेरूळचे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, उद्योगसमूहाचे प्रभाकर शिंदे व संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

आमदार बोरनारे वैजापूर तालुक्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असतात असे प्रशंसोद्गार काढून मुख्यमंत्री म्हणाले, राज्याला विकासाच्या दिशेने  घेऊन जात असताना  सामान्यांचा विकास हेच शासनाचे पहिले ध्येय आहे. राज्याच्या विकासासाठी संत महंताच्या आशीर्वादासह सर्वांचेच सहकार्य महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी विविध कल्याणकारी निर्णय शासनाने घेतलेले आहेत. सामान्य जनतेला अपेक्षित न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. राज्य शासनाच्या पाठीशी केंद्र सरकार भक्कमपणे उभे आहे. महालगाव येथे उभारण्यात येत असलेल्या साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे, या कारखान्यास सर्वतोपरी मदत केली जाईल. असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

तालुक्यातील सर्व विकासकामांना प्राधान्य दिले जाणार असून नागमठाण येथील बऱ्याच वर्षांपासून रखडलेला पूलही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. वेरूळ येथील विश्वशांती धाम परिसरातील विविध विकासकामे, सरला बेट येथील रस्ता रूंदीकरण, डांबरीकरणाचेही काम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

आमदार बोरनारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष देऊन वैजापूर तालुक्यासाठीही भरीव निधीही दिल्याची माहिती दिली. रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन योजनेंतर्गत जिल्हा बँकेकडून  कर्ज काढलेल्या जवळपास पंधरा गावातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यासह तालुक्यातील बऱ्याच दिवसांपासून रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. महंत रामगिरी महाराज यांनीही यावेळी विचार मांडले. प्रास्ताविक उद्योजक प्रभाकर शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करुन कारखान्याचे भूमिपूजन  करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!