दैनिक स्थैर्य | दि. २९ मे २०२३ | सातारा |
राजधानी सातार्यातून दुर्गदुर्गेश्वर रायगडावर येणार्या मानाच्या कलशाच्या स्वागताला यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने सचिव महेश पाटील व शेखर तोडकर यांनी दिली.
सातारा आणि रायगड यामध्ये दृढ संबंध प्रस्थापित होण्यासाठी शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने गेल्या बारा वर्षांपासून “राजधानी ते राजधानी” अशी मोहीम राबवली जाते. सातार्यातून येणार्या मंगल कलशाला रायगडावर विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ऐन लॉकडाऊन काळातही ही परंपरा अबाधित होती. यंदा ३५० वा राज्याभिषेक दिन असून यातील तांत्रिक चुका सुधारण्यासाठी सातार्याच्या समितीने दिलेल्या राज्यस्तरीय लढ्याला यंदा यश आले आहे.
यंदा ही मोहीम गुरुवार १ जून रोजी सकाळी १० वाजता सातार्याच्या शिवतीर्थावरून पालकमंत्री शंभूराज देसाई, बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, झेडपी सीईओ ज्ञानेश्वर खिलारी आदी मान्यवर व शिवभक्तांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील बारा नद्यांच्या जलाचे पूजन करून हा कलश तयार होतो. गुरुवारी मध्यरात्री हा कलश रायगडावर दाखल होईल. भल्या पहाटे शिरकाई देवीच्या मंदिरात कलशाचे विधिवत पूजन होऊन जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या दर्शनानंतर हा कलश होळीच्या माळावरून राजसदरेकडे निघेल. पहाटे याचे स्वागत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कलशाचे स्वागत होईल आणि मुख्य राज्यभिषेकाला प्रारंभ होईल, असे ही त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून येणार्या मोहिमेतील शिवभक्तांचे एकत्रीकरण हे महाबळेश्वरच्या पुढे प्रतापगड फाट्यावर होणार आहे. मोहिमेतील सर्व भक्तांनी गुरुवारी सायंकाळी ६.०० वाजता पाचाडला पोहोचणे अपेक्षित आहे.
यंदाच्या ३५०व्या वर्षांनिमित्त पुढील एक वर्षात एक लाख अमराठी शिवभक्त रायगडावर आणण्याच्या मोहिमेचा शुभारंभ डॉ. संदीप महिंद गुरुजी यांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रायगडावर ‘रोप वे’ ने येणार्या शिवभक्तांनी आपली आधारकार्ड प्रत समितीकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.