नातवासोबत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली रंगपंचमी; पोलिसांना गोडधोड भरवून होळीचा आनंद केला द्विगुणित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ मार्च २०२२ । ठाणे । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाणे येथील निवासस्थानी धुळवडीचा सण मोठया उत्साहात साजरा केला. नातू रुद्रांक्षकडून रंग लावून घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला.

धुलीवंदनाच्या निमित्ताने ठाण्यातील शुभ दीप या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कुटूंबियांच्या तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस बांधवांसोबत धुळवड साजरी केली.

कोरोनाचे निर्बंध राज्य शासनाकडून हटविल्यानंतर दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी आणि आता होळी पाठोपाठ धुलीवंदनाचा सणही मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातील जनतेला नैसर्गिक रंगाचा वापर करून तसेच पर्यावरणपूरक पध्दतीने होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या कुटूंबाची सुरक्षा पाहणारे पोलिस बांधव, सर्व कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसोबत रंग खेळत त्यांना गोडाचे पदार्थ खाऊ घातले. जनतेचा मुख्यमंत्री हा जनतेमध्ये मिसळून धुळवड साजरी करीत असल्याचे पाहून पोलिसांनीही आपलेपणाने रंग लावून घेत त्यांच्यासह रंगपंचमी साजरी केली.

राज्यात सोमवारपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. अशा नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाठिशी राज्य सरकार ठामपणे उभे असून त्यांना लागेल ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे आणि सर्व पोलिस बांधवांसह बंगल्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!