स्तनपान व शिशुपोषण या विषयाची सामाजिक लोकचळवळ निर्माण करणार – मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२२ । सातारा । एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाचे प्रमाण वाढवणे, सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपानाचे प्रमाण वाढविणे व बाळाच्या सहा महिन्यानंतर दोन वर्षापर्यंत बाळाला आईच्या दूधाबरोबर वरचा आहार याचे प्रमाण वाढविणे यासाठी मिशन धाराऊ मातादुग्धामृतम् ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार  जिल्ह्यामध्ये स्तनपान व शिशुपोषण  या विषयाची सामाजिक लोकचळवळ निर्माण  करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.

महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद यांच्यामार्फत मिशन धाराऊ स्तनपान व शिशुपोषण विषयी  जिल्हा परिषदमध्ये पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युनिसेफचे स्तनपान व शिशुपोषणचे राज्य सल्लागार पांडुरंग सुदामे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) रोहिणी ढवळे आणि विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. गौडा म्हणाले, स्तनपान व शिशुपोषण  या विषयी लोकचळवळ सर्वत्र व्यापक स्वरुपात होण्यासाठी तालुका स्तरावरील बालविकास  प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदनीस यांच्याद्वारे  घरोघरी याची जनजागृती व प्रबोधनपर कार्यक्रम ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात राबवून त्याला मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. समाजातील सर्व घटकापर्यंत स्तनपान व शिशुपोषणाबाबत शास्त्रीय माहिती दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक गावात धाराऊ सखी पथक तयार करण्यात येणार असून त्याद्वारे गरोदर महिला व स्तनदा माता यांच्या समस्या पण सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यावेळी युनिसेफचे स्तनपान व शिशुपोषणचे राज्य सल्लागार पांडुरंग सुदामे यांनी एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाची व त्यामुळे बाळाच्या आरोग्य विषयी होणारे फायदे याचबरोबर स्तनपानासोबत दिला जाणारा पुरक आहार का महत्वाचा आहे  या विषयी सविस्तर माहिती  दिली. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) रोहिणी ढवळे यांनी मिशन धाराऊ मातादुग्धामृतम् या अभियानाची सखोल माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!