
दैनिक स्थैर्य । 17 जुलै 2025 । सातारा । भारताच्या इतिहासातील सुवर्णयुग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अलौकिक कालखंड आहे. त्या सुवर्णकाळाची लेखणी म्हणजे समर्थ रामदास आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.
येथे समर्थ सेवा मंडळातर्फे छत्रपती शिवरायांचे शिवचरित्र व समर्थ रामदास स्वामी चरित्राचा प्रकाशन सोहळा झाला. त्या वेळी ते बोलत होते. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ विक्रमसिंह मोहिते, सज्जनगडच्या समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी, गुरुनाथ महाराज कोटणीस, डॉ. अच्युत गोडबोले, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, अर्बन कुटुंब सल्लागार दिलीप गुरव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभागाचे कार्यवाह विजय जोशी, जिल्हा सहसंघ चालक शशिकांत फिरंगे, जिल्हा कार्यवाह वैभव डुबल उपस्थित होते.
भय्याजी जोशी म्हणाले, भारत देश पुण्यभूमी, देवभूमी, पराक्रमी पुरुषांची आणि संतांची भूमी आहे. अनेक वर्षांच्या आक्रमणानंतर, गुलामी नंतर 350 वर्षांपूर्वी भारताच्या इतिहासातील सुवर्णयुग सुरू झाले. ज्ञान, भक्ती, कर्म व साधना या गुणांवर सज्जनलोक समाजात योगदान देतात. मात्र, यापैकी कोणताही एक मार्ग हा परिपूर्ण नाही. चारही गुण एकत्र येतात त्यालाच योगी असे म्हणतात.
इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रात मात्र चारही गुणांचा संगम आहे, म्हणूनच समर्थ रामदास छत्रपती शिवरायांना श्रीमंत योगी असे म्हणतात. यावेळी विक्रमसिंह मोहिते यांचेही भाषण झाले.
सज्जनगडावरीलश्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड महंत योगेशबुवा रामदासी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजेंद्र अलोने यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत आवले यांनी आभार केले.