दैनिक स्थैर्य । दि. २१ नोव्हेंबर २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागात एम.ए भाग १ मराठी विषयास शिक्षण घेत असलेल्या रोहित शंकर बनसोडे मु.पो.गोंदवले खुर्द ता.माण.जिल्हा सातारा या विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासनाचा’ छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार -२०१८ हा जाहीर झाला आहे. राज्यस्तरावरील व्यक्ती संवर्गात दिला जाणारा हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार असून रुपये पन्नास हजार व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे त्याचे स्वरूप आहे.दिनांक १७ नोव्हेंबर २०२२
रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व सामाजिक वनीकरण विभागाने शासन निर्णय प्रसारित केला आहे. वृक्षारोपण व वनसंवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना १९८८ पासून महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी या पुरस्काराचे नाव बदलण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार असे सुधारित नाव ठेवण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्याच्या पुणे विभागात रोहित बनसोडे यांने दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.त्याच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर,सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे तसेच छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे यांनी त्याचे व कुटुंबीयांचे अभिनंदन केले. वयाच्या २१-२२ व्या वर्षी त्याने केलेल्या परिश्रमाचा सन्मान होणार आहे .
रोहितशी याबाबत संवाद साधला तो म्हणाला की माझा जन्म ३१ डिसेंबर २००१ चा. प्राथमिक शिक्षण गोंदवले खुर्द येथील. जिल्हा परिषदच्या शाळेत झाले ५ वी ते १० वीपर्यंतचे रयत शिक्षण संस्थेच्या गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द येथे झाले. याशाळेत असताना प्रल्हाद चंदनशिवे,सादिक शेख सर, प्रमोद माने सर यांचे प्रेम आणि प्रोत्साहन मला मिळाले. १०वी ची परीक्षा दिल्यानंतर अमीर खान यांच्या सत्यमेव जयते या एका कार्यक्रमात मी जंगलात लागलेला वणवा विझविण्यासाठी चोचीत पाणी घेऊन आग विझवनाऱ्या चिमणीची गोष्ट ऐकली आणि इवलीशी चिमणी म्हणते की जेंव्हा कधी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा मी वणव्याला घाबरून पळून जात नव्हते तर चोचीत पाणी आणून जंगलाची आग विझवत होते, हीच कथा माझी प्रेरणा बनली.संकट कितीही येवो माणसाने प्रयत्नवादी बनले पाहिजे हे माझ्या मनात रुजले .माणचा दुष्काळ दुष्काळ सर्वाना माहीत होता. आम्हाला शेती नाही भूमिहीन असलेल्या लोकांना मिळालेल्या घरात मी आजही राहतोय.दुष्काळात आम्ही पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी विहिरी ,हापसा शोधायचो .विहिरीत उतरून ओंजळीने सुद्धा पाणी भरले … २०१७ दहावी परीक्षा दिल्यानंतर उन्हाळा सुट्टीमध्ये मी माळावर गेलो. आपण सुद्धा पावसाचे पाणी वाचवायचे ही भावना ठेवून शेजारच्या पमा आजीकडून टिकाव खोरे घेऊन माळावर गेलो. कुणाच्या खाजगी शेतीत मी जाऊ शकत नव्हतो.म्हणून वन क्षेत्रात चर खोदून पावसाचे पाणी अडवायचे व जीरवायचे ठरवले. समतल चर कसे खोदायचे माहीत नव्हते. खड्डे खोदायचे काम केले. हाताला फोड आले.ताप आला आजारी पडलो.हा मुलगा कुठे काम करतो का याच्या हाताला फोड कसे आले ? याची वडिलांनी विचारणा केली मग त्यांना खरी स्टोरी सांगितली.त्यांनी माझी भावना समजून साथ दिली… हे काम करताना मी
एकटा कुठे जातो हे माझी छोटी बहीण रक्षिता विचारू लागली ..लांडगे ,तरस,भुताखेताची भीती असल्याने मी तिला ती मागे
लागलीतरी सुरवातीस नेले नाही, नंतर मात्र मी खड्डे खणतो तू उंच टेकावर बसून कुठला लांडगा, तरस येत नाही यावर लक्ष ठेवत जा मग भरपूर खड्डे खणले.रक्षिताही सोबत होतीच. मी खड्डे खणत राहिलो.झाडे लावत राहिलो. त्यातूनच आमच्यावर लोकमत मध्ये बातमी प्रसिद्ध झाली. यातून पुढे याप्रकारचे काम करण्यासाठी ६५ गावे तयार झाली. लोक बोलवू लागले. १ कोटी लिटर पाणी जमिनीत अडवण्याचे मी केले.
पिंपरण,वड ,नांदरुक अशी अनेक वनझाडे लावली,हाताने पाणी घातले.झाडे जागवली ,मला उष्माघाताचा त्रास झाला ठाणे
येथील महेश कदम यांनी इंजिन दिले. तलावातल्या पाण्याचा उपयोग करून झाडांना पाणी घातले. मार्च ,एप्रिल,मे तलाव कोरडा असल्यावर जवळच जानुबाईचे मंदिराच्या शेजारी असलेल्या हापशाचे पाणी घातले.– तलावातील एक पडकी विहीरहोती त्यातील गाळ काढला.त्याच विहिरीतून पाणी काढून झाडाला घातले..दहिवडी कॉलेजला १७ – २०१८ ला प्रवेश घेतला. असेही कधी अनुभव आले की एकटा हे असले काम करून काय करणार ?असे प्रश्न विचारून काही लोक मला खच्ची करायचे पण मी लक्ष न देता हे काम करीत राहिलो. २०१९ मध्ये वाटर कप -पत्रकार यांनी दखल घेतली,अनेक लोकांनी भेटी दिल्या. अनेकांनी मनापासून साथ दिली. काही लोकांनी वड पिंपळ याना एकदाच पाणी घातले तरी चालते असे म्हटले. पण हे खरे नाही. मी अनुभवाने सांगतो की या झाडांची काळजी घ्यावी लागते.पाण्याची गरज असते. मी गोंदवले खुर्द ,बुद्रुक येरमल वाडी ,शिखर शिंगणापूर ,कोथळी,आळंदी, गावात तजाऊन काम सुरु केले आहे. देणगीतून फंड गोळा करून पुण्याहून झाडे आणतो. घरात झाडे पुरेशी ठेवायला जागा नाही. माझा व्यायाम करणे ,प्रवास करणे ,चित्रपट पाहणे ,रनिंग ,झाडे लावणे आणि झाडे जगवणे हाच माझा छंद आहे, चित्रपट मला काही चांगले देत असतो.तुषार तपासे ,नलवडे जय महाराष्ट्र ,राहुल तपासे, आज तक, टाईम्स यांनी माझ्या कामाची पूर्वी दखल घेतली ,४ ते ५ हजार झाडे आज उभी राहिलीत. भूमिहीनसाठी असलेल्या वस्तीत राहतो. दहिवडी कॉलेज येथे असलेल्या सांगलीच्या पाटील मॅडम यांनी मला प्रोत्साहन दिले,वाघमोडे, देठे मॅडम, यांनी मला अभ्यास करण्यासाठी पुस्तके नोट्स दिल्या असे त्यांनी सांगितले.महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्याने
सर्वांचे,वनखात्याचे देखील आभार मानले. स्वयप्रेरणेने पर्यावरण रक्षण करणाऱ्या माझ्या हाताला सरकारने वन खात्यातच नोकरी दिली तर माझे तर बरे होईल अशी अपेक्षा त्याने यावेळी व्यक्त केली.