दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२२ । सातारा । पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९४७ साली स्थापन केलेल्या संस्थेच्या पहिल्याच छत्रपती शिवाजी कॉलेजला ७५ वर्षे पूर्ण झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाबरोबरच कॉलेजच्या अमृत महोत्सवी वर्षात कॉलेजमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.‘ छत्रपती शिवाजी कॉलेज’ हे महाविद्यालयाचे नाव असल्याने त्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष असणारया किल्ले प्रतापगड येथे महाराजांच्या पराक्रमातून स्फूर्ती ,चैतन्य व प्रेरणा घेण्यासाठी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा ते किल्ले प्रतापगड मोटार सायकल रॅलीचे आयोजन शनिवार दिनांक १८ जून रोजी छत्रपती शिवाजी कॉलेज द्वारा करण्यात करण्यात आले. सकाळी ७.३० वाजता महाविद्यालयाच्या मैदानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्या समोर विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने मोटरसायकल घेऊन जमले होते.
प्रारंभी सातारा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.भगवान निंबाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. कॉलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर,संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे,श्री.राहुल खाडे,रॅलीचे समन्वयक प्रा.विक्रमसिंह ननावरे ,लेफ्टनंट प्रा.केशव पवार, उपप्राचार्य अनिलकुमार वावरे, उपप्राचार्य रोशनआरा शेख, कमवा आणि शिका योजनेचे प्रमुख व उपप्राचार्य रामराजे मानेदेशमुख,डॉ.शिवाजीराव पाटील यांनीही फुले अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय असा शिवरायांचा जयजयकार विद्यार्थ्यांनी केला. शिवरायांचे दर्शन घेऊन रॅली रयत बँकेस वळसा घालून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याजवळ आली.तिथे कर्मवीर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात प्रमुख अतिथी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर,प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर व प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांनी एकत्रित येत भगवा ध्वज उंचावून रॅलीस प्रतापगडाकडे वाटचाल करण्यास संमती देऊन शुभेच्छा दिल्या.सकाळच्या प्रसन्न वातावरणात ,आनंदी ,उत्साही व हसऱ्या चेहऱ्याने आपल्या मोटरसायकलवरून बसून मोटारसायकल स्वार निघाले ,बुलेट स्वार,पायलट कार, क्रीडा विभाग ,एन.सी.सी.,एन.एस.एस,कमवा आणि शिकाचे विद्यार्थी ,प्रत्येक विभागातील विद्यार्थी ,प्राध्यापक,सेवक सर्वच जण निघाले. ढोल ताशांच्या गजरात मार्गक्रमण सुरु झाले. साताऱ्यातील पोवई नाका ,छ.शाहू चौक, कर्मवीर समाधी परिसर,रयत शिक्षण संस्था ,मोती चौक ,राजवाडा ,राधिका चौक ,शाहूपुरी ,करंजे , मोळाचा ओढा मार्गे पुढे पुढे जात मेढा येथे रॅली आली. तेंव्हा शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील प्राचार्य व प्राध्यापक यांनी रॅलीचे स्वागत केले. मेढा येथे रलीतील सर्वांनी चहा नाश्ता करून पुढे प्रस्थान केले. मेढा ते महाबळेश्वर घाट मार्गे आंबेनळी घाट पार करत,मोटार सायकलवरून वळसे घेत सभोवताली असलेल्या घनदाट झाडीतून मार्गक्रमण करीत रॅली सकाळी ११.३० वाजता सुखरूप प्रतापगड पायथ्याशी पोचली. प्रतापगडावर पोचल्यावर शिवरायांच्या आठवणीने उर भरून आल्याने महाराजांचा जयघोष विद्यार्थ्यांनी केला.आणि गडावर सर्वजण पोचले. २० फुटी चबुतरयावर १७ फुट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास सर्वांनी विनम्रतेने अभिवादन केले. पुतळ्याच्या समोर झालेल्या छोटेखानी सभेत प्रारंभी प्रास्ताविक डॉ.सुभाष कारंडे यांनी रॅलीचे प्रयोजन स्पष्ट केले. प्रतापगडाचे महत्व इतिहास विभागातील डॉ.विकास येलमार यांनी सांगितले. ते म्हणाले ‘’हिंदवी स्वराज्याच्या दृष्टिकोनातून जावळीचा ताबा ही अत्यंत महत्त्वाची आणि हितकारक घटना होती महाराजांना जावळीच्या रूपाने एक अत्यंत सुरक्षित ठिकाण
मिळाले आणि या जावळीच्या प्रदेशातील भोरप्या नावाच्या डोंगरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाची निर्मिती केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आणि अखेरपर्यंत अपराजित राहिलेला मानाचा किल्ला म्हणजे प्रतापगड.’’ त्यांनी प्रतापगडाचा इतिहास, भौगोलिक परिस्थिती , किल्ल्यावर झालेली बांधकामे, किल्ल्याची वैशिष्ट्ये ऐतिहासिक घटना व व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून किल्ल्याचे असलेले महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली.पुढे बोलताना ते म्हणाले’’ सन १६६१ च्या पावसाळ्यात महाराज तुळजापूरच्या प्रसिद्ध भवानी मातेच्या दर्शनाला जाऊ शकले नाहीत म्हणून प्रतापगडावर भवानीचे भव्य मंदिर उभारण्याचे ठरविले.
छत्रपती शिवाजी महाराज व विजापूरचा सरदार अफजल खान यांच्यातील ऐतिहासिक प्रसिद्ध भेट प्रताप गडाच्या माचीवर गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी झाली. या भेटीत प्रथम दगा अफजलखानाने दिला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला ही घटना इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. कॅप्टन मोडक याने या प्रसंगाचे वर्णन ‘छत्रपती शिवाजी महाराजांची धाडशी प्रतिकारशक्ती’ असे केले आहे. या लढाईनंतर शिवाजी महाराजांनी वाई परगण्यातील लोकांना स्वराज्यात मुस्लिम राजवटीपेक्षा चांगली वागणूक देण्याचे आणि त्यांच्या धर्मात ढवळाढवळ न करण्याचे जाहीर केले. प्रत्येकाला त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकऱ्या दिल्या जातील शिवाय मुस्लिमांच्या मशिदीच्या खर्चासाठीची अनुदाने पूर्ववत चालू राहतील असे सांगितले. खरेतर तर आजच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या नीतीचा अवलंब करून आपल्या देशात महाराजांप्रमाणे सर्वधर्मसमभावाचे धोरण राबवून सर्वांना समान न्याय देणे हे उचित ठरणार आहे अशा प्रकारचे धोरण राबविल्यास निश्चितच आपली प्रगती होण्यास व आपण महासत्ता होण्यास मदत होणार आहे. छत्रपती शिवाजी
महाराज स्वतः हिंदू होते परंतु राजा म्हणून त्यांनी स्वतःच्या राज्यात प्रजेच्या धर्मावरून भेद केला नाही. हिंदुना एक वागणूक व मुस्लिमांना दुसरी वागणूक असे कधी केले नाही. मुसलमानांना त्यांनी वेगळ्या धर्माचे म्हणून पक्षपातीपणाने वागवले नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माभिमानी होते पण हा अभिमान इतर धर्मियांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता. महाराजांनी सतराव्या शतकामध्ये रयतेच्या हितासाठी कल्याणकारी राज्याची स्थापना केली रयतेचे राज्य निर्माण केले. यातूनच प्रेरणा घेऊन पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत
शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा पोहोचविली.’’ असे ते म्हणाले.
यावेळी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर अण्णांची आठवण सांगितली ते म्हणाले की आपल्या कॉलेजला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्यानंतर कर्मवीर यांच्याकडे एक देणगीदार येऊन म्हणाला ‘’मी मोठो देणगी देतो हाराजांचे नाव बदलून माझे बापाचे नाव कॉलेजला द्या’’ ,त्यावेळी कर्मवीरांनी एक वेळ मी माझ्या बापाचे नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी महाराज हे कॉलेजला दिलेले नाव कदापि बदलणार नाही. असे ठणकावून सांगितले होते. कर्मवीर अण्णांचे छत्रपती शिवाजी महाराज हे
प्रेरणास्थान होते.शिवरायांनी जशी रयतेची काळजी घेतली तशीच कर्मवीरांनी रयत कल्याणाची काळजी घेतली. छत्रपती शिवाजी कॉलेज हे रयतेच्या कल्याणाचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.म्हणूनच प्रतापगड किल्ल्याला आपण भेट देऊन प्रेरणा व विचार घेत असल्याचेही ते म्हणाले. एन.सी.सी.चे प्रमुख लेफ्टनंट प्रा.केशव पवार म्हणाले की ‘’छत्रपती शिवाजी महाराज हे साहस आणि शौर्य याची प्रेरणा आहे. युवकात साहस, शिस्त, इतिहास समजण्यासाठी ही रॅली उपयुक्त आहे. पर्यावरण आणि साहस ,शिवकालीन मार्शल आर्ट याची जाणीव रॅलीने करून दिली .प्रा.रोशना आरा शेख म्हणाल्या की ‘तरुणांईला प्रेरणा मिळण्यासाठी आणि उत्साह संवर्धित करणारी ही रॅली आहे .’ यावेळी शिवकालीन लाठी काठीचे या मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक प्रा.केशव पवार व प्रा.राम गाडेकर यांनी करून दाखविले. प्रतापगडाच्या बुरुजावर विद्यार्थी व प्राध्यापकांनी परिसरातील आसमंत टेहळणी करून इतिहास डोळ्यात भरून घेतला.निसर्गाचे मनोहारी रूपाचे विलोभनीय दर्शन अनुभवले. गडावरील भवानी मातेचे दर्शन घेऊन आणि टेहळणी बुरुजावरील भगव्या पताकेचे दर्शन घेऊन रॅली गडउतार झाली. प्रतापगडाच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिद्ध्यात पिठले ,भाकरी ,ठेचा ,दही याचा आस्वाद सर्वांनी घेतला. जेवल्याने पुन्हा सर्वजण ताजेतवाने झाले. आणि पुन्हा एकदा महाराजांना मुजरा ,अभिवादन करून प्रतापगड वरून रॅली परत निघाली, आलेल्या मार्गानेच पुन्हा शिस्तबद्ध रित्या परतीचा प्रवास सुरु केला. परतीच्या मार्गावर मान्सूनचे झाकोळून आलेले ढग. आले होते पावसाची रिमझिम सुरु झाली. पहिल्या पावसाच्या वर्षाधारा अंगावर झेलत–मनात उत्साह आनंद घेत ,उभ्या डोंगरांच्या कड्याशी गुजगोष्टी करीत. सामुहिक शक्तीचा ,एकात्म भावनेचा आनंद घेत रॅली घाट रस्ता उतरत,गिरक्या घेत घेत मेढा येथे आली. तिथे चहापान घेऊन अखेर सायंकाळी ६.१५ वाजता रॅली साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात आली.
पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा जयघोष करून वेगळ्याच चैतन्याचा आनंद घेऊन सर्व जण घरी परतले. अमृत महोत्सवी ही रॅली स्मरणीय ठरली. या रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांचे प्राचार्यांनी अभिनदन केले व रॅली यशवी आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.