नाशिक : हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून लपवाछपवी, योगी सरकारवर छगन भुजबळ यांचा आरोप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.४: दिल्लीतील निर्भया प्रकरणावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन करून देश पेटवला आणि त्या लाटेवर हे सरकार निवडून आले आणि मोदी पंतप्रधान झाले. निर्भयावेळी पोलिसांनी लपवाछपवी केली नाही मात्र हाथरसप्रकरणी पोलिसांनी पूर्णपणे लपवाछपवी केल्याचे दिसते, असा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

हाथरसप्रकरणी उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या दडपशाहीच्या मुद्द्यावर भुजबळ यांनी ‘दिव्य मराठी’सोबत खास बातचीत केली. त्या वेळी पोलिस प्रशासन असो किंवा त्यांना आदेश देणारे जे कोणी असतील त्यांना शासन झाले पाहिजे, असे ते म्हणाले. राष्ट्रीय नेते प्रियंका गांधी, राहुल गांधी तसेच मीडियालाही हाथरसमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याबाबत भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, आपण कल्पना करू शकत नाही इतका भयंकर प्रकार आहे हा. एका दलित मुलीवर अत्याचार झाला आहे. या मुलीचे प्रेत पोलिसांनी गावामध्ये आणले मात्र आई-वडिलांना बघूसुद्धा दिले नाही. पोलिसांनी त्या मुलीचा अंत्यविधी पार पाडला. संशयास्पद भूमिका बजावणाऱ्या पोलिसांचे काय, असाही सवाल केला. या वेळी भुजबळ यांनी जुनी आठवण सांगितली. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना विरोधी पक्षातील इंदिरा गांधी बेल्ची येथे पीडितांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. अत्यंत कडक स्वभावाच्या मोरारजी देसाई यांनी इंदिरा गांधींना कोणताही अडथळा निर्माण करू दिला नाही, असे भुजबळ म्हणाले.

राहुल गांधींना धक्काबुक्की; पत्रकारांची अडवणूक का? : राहुल व प्रियंका यांना पीडितेच्या घरी जाण्यापासून नुसते अडवले नाही तर कॉलरला हात लावून ढककले. ही कोणती लोकशाही? आता वर्तमानपत्रातून समजते की संपूर्ण गावाला पोलिसांनी वेढा घातलेला आहे. एकही पत्रकार त्या ठिकाणी आधी जाऊ शकत नव्हता. पीडितेच्या कुटुंबांना सांगितले जाते की तुम्ही जास्त बोलायचे नाही. हे मीडियावाले आज आहेत आणि उद्या नाही. आम्ही आहोत तिथे आम्ही बघून घेऊ. सत्य बाहेर येऊ नये म्हणून मीडियाला रोखले गेले होते, असे भुजबळ म्हणाले.

वरची ऑर्डर म्हणजे नेमकी कोणाची?


पोलिस म्हणता की वरची ऑर्डर. म्हणजे नेमके कोण? मागे चित्रपटातील एका भगिनीने सरळ सरळ मुख्यमंत्र्यांनाच जबाबदार धरले. मुंबईला पाकिस्तानची उपमा दिली. हे खूप भयंकर प्रकरण आहे. यात बलात्कार, खून, मोठ्या पक्षाच्या नेत्याला खाली पाडणे एवढं सगळं घडलं आहे. त्यामुळे याची जबाबदारी मुख्यमंत्री योगींचीच आहे. त्यांनी प्रायश्चित्त घेतले पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!