दैनिक स्थैर्य | दि. ०९ नोव्हेंबर २०२४ | फलटण | शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले स्व. सुभाष शिंदे यांचे चिरंजीव व सुन ह्या आज उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याचे मेसेजेस हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत साखरवाडी येथे होणाऱ्या सभेमध्ये चेतन शिंदे व सौ. प्रतिभा शिंदे हे प्रवेश करणार असल्याचा दावा सुद्धा सदरील मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
माजी केंद्रीय मंत्री तथा जेष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकारणाच्या सुरवातीच्या काळापासून फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते स्व. सुभाष शिंदे हे त्यांच्या सोबत राहिले होते. शरद पवारांच्या चांगल्या काळासोबत अडचणीच्या काळामध्ये सुद्धा स्व. सुभाष शिंदे यांनी शरद पवारांची साथ सोडली नव्हती. त्यांचे चिरंजीव तथा फलटण बाजार समितीचे संचालक चेतन शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या फलटण – कोरेगाव विधानसभा प्रमुख सौ. प्रतिभा चेतन शिंदे यांनी शरद पवारांना राम राम ठोकत अजित पवारांची साथ देण्याची ठरवले असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.