स्थैर्य, खंडाळा, दि. ०८ : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात डोंगराला लागलेल्या आगीमुळे एक रसायनाचा ट्रक आणि कार जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग आटोक्यात येईपर्यंत खंबाटकीतून जाणारी वाहतूक बोगद्यातून सातार्याकडे तातडीने वळवण्यात आली.
याबाबत माहिती अशी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील डोंगरात बुधवारी दुपारी वणवा पेटला होता. दत्त मंदिरासमोरील वळणावर वाळलेलं गवत जळत असताना ही आग भडकली. आगीचा भडका उडाल्यानंतर पुण्याहून सातार्याकडे जाणारा रासायनिक मालाची वाहतूक करणार्या ट्रकला व त्याच्या मागे असणार्या कारला आग लागली. यावेळी आग विझवणारी यंत्रणा लगेचच उपलब्ध होऊ न शकल्याने दोन्ही वाहने धडधडून पेटली व जळून खाक झाली. आगीचे लोट मोठे पाहून घाटातून जाणार्या प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. या अग्नितांडवाची माहिती मिळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली.
घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमक दल व खंडाळा ,भुईंज व महामार्ग पोलिसांनी व अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी धाव घेतली. दोन वाहने पेटल्याने घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, आगीचे व धुराचे प्रमाण वाढल्याने प्रवाशी आणि वाहनधारक भीतीच्या सावटाखाली आले होते. आगीमुळे वाहतूक खोळंबल्याने घाट रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक बोगद्यातून सातार्याकडे वळवण्यात आली. अथक प्रयत्नानंतर अग्निशामन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.