दैनिक स्थैर्य | दि. १६ जून २०२४ | फलटण |
सध्या तरुण पिढी भरकटत चालली असून रासायनिक खतांच्या खाद्यपदार्थांमुळे रासायनिक वर्तणूक होऊ लागली असल्याची खंत विवेकानंद पाटील माजगावकर यांनी व्यक्त केली.
दुधेबावी, ता. फलटण येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत विवेकानंद पाटील माजगावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. रवींद्र कोलवडकर होते.
विवेकानंद पाटील माजगावकर म्हणाले, मुलांना संस्कार देणारी पिढी कमी पडू लागली असून, मुलांची गुणवत्ता वाढलीच पाहिजे याबद्दल शंका नाही. गुणवत्तेबरोबर मूल्यसंस्कार तेवढेच गरजेचे आहेत. मुलांना जीवनमूल्यांची रुजवणूक होण्यासाठी पालकांनी प्रयत्न करणं आवश्यक असून पुराणकाळातील संस्कृतीचं योग्य असल्याचे माजगावकर यांनी निदर्शनास आणून दिले.
समजूतदारपणा, वडीलधार्यांचा आदर, सकारात्मकता याचा स्वीकार आणि द्वेष, मत्सर, तिरस्कार, राग याचा त्याग करून, सुसंस्कारीत जीवन जगल्यास निश्चितपणे आनंद मिळेल, असा विश्वास माजगावकर यांनी व्यक्त केला.
प्रा. रवींद्र कोलवडकर म्हणाले, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानची संत गाडगेबाबा व्याख्यानमाला निश्चितच जिल्ह्यात आदर्शदायी असून सातत्यपूर्ण २४ वर्षे व्याख्यानमाला चालवणं प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखादी चांगली गोष्ट सुरू करणं सोपं असतं, तथापि ती टिकून टिकवणे यातच खरी कसोटी असल्याचे कोलवडकर यांनी निदर्शनास आणले. प्रबोधनाने समाज परिवर्तन निश्चित होत असल्याचा विश्वास कोलवडकर यांनी व्यक्त केला.
स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे व सचिव विठ्ठल सोनवलकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रतिष्ठानचे खजिनदार डॉ. युवराज एकळ यांनी मानले.
यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष भांड, माजी सैनिक बापूराव सोनवलकर, भानुदास सोनवलकर, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघांचे अध्यक्ष सुभाषराव सोनवलकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब भुंजे, तात्याबा सोनवलकर, भीमराव नाळे, पोपटराव सोनवलकर यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.