वादग्रस्त जागेचा व्यवहार करून ५ लाखांची फसवणूक; शहर पोलिसात गुन्हा दाखल

साठेखत करून पैसे घेतले, मात्र खरेदीखत करण्यास दिला नकार


स्थैर्य, फलटण, दि. ०९ ऑगस्ट : कागदोपत्री वादग्रस्त असलेल्या जागेचा व्यवहार करून एका व्यक्तीची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, त्याच्या माजी शेजाऱ्याविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यक्तीने आपल्या माजी शेजाऱ्याकडून फरांदवाडी येथील एक घर आणि जमीन १३ लाख रुपयांना खरेदी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार, दि. ७ सप्टेंबर २०१९ रोजी फलटण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात साठेखत करून फिर्यादीने आरोपीला वेळोवेळी एकूण ५ लाख रुपये दिले.

जेव्हा फिर्यादीने खरेदीखत करण्यासाठी जागेच्या सातबारा उताऱ्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली, तेव्हा संबंधित जागेच्या क्षेत्रफळात आणि आणेवारीमध्ये तांत्रिक अडचण असल्याने तिचा दस्त होऊ शकत नाही, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. यानंतर फिर्यादीने आपले पैसे परत मागितले असता, आरोपीने ते देण्यास टाळाटाळ केली.

पैसे परत मिळत नसल्याने फिर्यादीने पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार, आरोपीने पैसे परत करण्याचे लेखी आश्वासन देऊनही ते न पाळल्याने, अखेर त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक संतोष कदम करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!