स्थैर्य, सातारा, दि. २३ : जुलै 2020 चा अखेरचा आठवडा चालू आहे. एक सकारात्मक बाब म्हणजे भारतातील तब्बल सात लाख बंधू-भगिनी कोरोना मुक्त झाले आहेत. तर महाराष्ट्रातील 1,80,000 बंधू-भगिनी कोरोना मुक्त झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा आकडा सुद्धा आशादायी आहे. भारताचा कोरोना मुक्तीचा दर तब्बल 62 टक्के वर पोहोचला आहे. आपण त्यात फर्स्टक्लास मिळवला आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी शेखर सिंह, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांचे काटेकोर नियोजन आणि मार्गदर्शनाखाली आपण काम करीत आहोत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. ज्या महानगरीची संपूर्ण महाराष्ट्राला काळजी वाटते त्या मुंबईने कोरोना मुक्तीचा दर 70 टक्के एवढा छान पैकी घातला आहे. सर्व कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन. तसेच; साथ देणाऱ्या नागरिक यांचेदेखील मनःपूर्वक अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. मात्र ;आता चौफेर जागृती महत्त्वाची आहे. केवळ प्रशासनाचे प्रयत्न नव्हे; तर नागरिकांनी देखील स्वतःच्या कुटुंबाची, पर्यायाने समाजाची काळजी घेणे गरजेचे आहे. केवळ औषधी उपचार नव्हे; तर आयुर्वेदिक उपचार, होमिओपॅथिक उपचार सरकारने सुचवले आहेत ते काटेकोरपणे अवलंब करणे आणि जबाबदारीने अवलंबणे गरजेचे आहे. कोणत्याही साथीच्या बाबतीत जी गोष्ट घडते, तीच कोरोनाच्या बाबतीत देखील घडत आहे. अधून मधून आकडे कमी होतात, जास्त होतात. परंतु नागरिकांनी अजिबात विचलित होऊ नये, असे नम्र आवाहन करावेसे वाटते. सार्वजनिक जीवन बहुतांशी चालू झाले आहे. प्रशासन काटेकोर प्रयत्न करीत आहे. बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी, तसेच; बाहेरून घरी जाणाऱ्या नागरिकांनी, खरेदी करणाऱ्या नागरिकांनी, कार्यालयातून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अशा सर्व जणांनी आपापल्या जबाबदाऱ्या ओळखणे अत्यंत गरजेचे बनले आहे. कोरोना विषाणूचा आपण सर्वजण प्राणपणाने मुकाबला करीत आहोत. तथापि, आता अनेक व्यवहार, अनेक कार्यालये सुरू झाली आहेत. लोकांचा वावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आपण काटेकोरपणे नियम पाळले पाहिजेत. प्रशासनाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत. अगदी आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी उपायांना सुद्धा मान्यता देण्यात आली आहे. घरगुती काळजी सुद्धा आपण घेऊ शकतो. याबाबत “वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक” अशा तिन्ही पातळीवर काम करणे आणि खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. संकट पूर्णपणे टळले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. अजूनही रुग्णांची संख्या कमी होणे गरजेचे आहे. कारण सर्व व्यवहार बऱ्यापैकी सुरू झाल्यामुळे सगळेजण एकत्र येणे, एकमेकांना भेटणे साहजिक आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच घटकांनी सामाजिक अंतर राखून आपली जबाबदारी ओळखून राष्ट्रीय कर्तव्य समजून काळजी घेतली पाहिजे. शासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय सुरू झाली आहेत. विशिष्ट अटी घालून सरकारने मान्यता दिली आहे. याचा विचार करता आता प्रशासनाला बळ देण्यासाठी नागरिकांनी स्वतः दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे नम्रपणे नागरिकांना सुचवावेसे वाटते. प्रशासन आपले काम आणि खबरदारी पहिल्या प्रमाणेच घेत आहे. परंतु नागरिकांची साथ मिळाली तर; आपण लवकरात लवकर यश मिळवू, यात कोणतीही शंका नाही. विषाणू प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर वेळोवेळी शासन महत्त्वाचे निर्णय घेत आहे. अशा सूचनांचे पालन केले तर; किती वैयक्तिक आणि सामाजिक फायदा होतो हे सर्व नागरिक, कर्मचारी यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. वेळोवेळीच्या परिस्थितीनुसार शासन-प्रशासन संकटावर मात करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे नियम निर्गमित करीत आहे. त्याचे पालन करणे गरजेचे आहे. कारण हे नियम अखेर सर्वांच्याच आणि एकंदरीत समाजाच्या दृष्टीने अत्यंत हितकारक असतात. काळजी घेत-घेत सहजपणे जगणे आता जमले पाहिजे. भीती आणि दहशत याच्या पलीकडे जाऊन आपली जबाबदारी ओळखली आणि खबरदारी घेण्यात सहजपणा आला तर संकट हळूहळू क्षीण होत जाते. अनेक सामाजिक संस्था; शासकीय संस्था, आयुर्वेद व्यासपीठ सारखे जागरूक मंच खूप सुंदर प्रयत्न करीत आहेत. जागृती होत आहे. “आर्सेनिक अल्बम 30” गोळ्यांचे वाटप व्यापक प्रमाणावर झाले आहे. अलीकडेच एका महत्त्वाच्या आदेशानुसार शासनाने कर्मचारी, अधिकारी तसेच; कार्यालयात भेट देणाऱ्या नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याचे निर्देश दिले आहेत. संबंधित सर्वांनी या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. शासनाने नुकत्याच दिलेल्या निर्देशानुसार सविस्तर नियमावली तयार केली आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कार्यालयात आल्यावर काय खबरदारी घ्यावी, तसेच; नागरिकांनी कार्यालयात आल्यावर काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तरपणे शासनाने नियम पाठविले आहेत. त्यानुसार कर्मचारी तसेच; नागरिकांनी कार्यालयात येते वेळी थर्मल स्कॅनरवर तापमान पहावे आणि खात्री करावी. कार्यालयाला भेट देणारे अभ्यागतांना मास्क वापरणे अनिवार्य आहे. तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांना देखील पूर्णवेळ मास्क वापरणे अनिवार्य आहे. कार्यालयातील खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा. वारंवार ज्यांना स्पर्श केला जातो अशा वस्तू तसेच पृष्ठभाग यांची स्वच्छता व्यवस्थित ठेवावी. कार्यालयात माहितीसाठी माहितीपत्रक लावावे. कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे वैयक्तिक स्वच्छता सांभाळावी. दर दोन तासांनी, तसेच; स्वच्छतागृह वापरल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुवावेत. कर्मचाऱ्यांनी एकत्र थांबू नये. तीन फूट अंतर पाळावे. दर दोन तासांनी हात धुवावेत. कार्यालयातील वस्तू निर्जंतुक कराव्यात. दिवसातून 2 वेळा सर्व वस्तू स्वच्छ कराव्यात. हवा खेळती राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. कार्यालयात कमीतकमी लोक कसे भेट देतील, याची काळजी घ्यावी. एकत्र बैठका घेणे टाळून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधावा.
कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सातत्याने स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. कमीत कमी अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, असे देखील आदेशात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांपैकी कोणास विषाणूची लागण झाल्यास काय करावे याबद्दल देखील सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. अशा सर्वच सूचनांचे कर्मचारी, अधिकारी आणि कार्यालयाला भेट देणार्या अभ्यागत यांनी काटेकोरपणे पालन करावे. वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता आणि नियम काटेकोरपणे पाळल्यास या संकटावर मात करता येणे सहज शक्य आहे. सामूहिक प्रयत्न हाच अशा संकटावरील मात करण्याचा प्रभावी उपाय असतो. कोणी एक व्यक्ती किंवा केवळ शासन किंवा केवळ प्रशासन अशावेळी संपूर्णपणे यश मिळवू शकत नाही. सामाजिक आधार गरजेचा असतो. आता जून 2020 चा शेवटचा सप्ताह संपत आला असताना रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही सातारा जिल्ह्यात खूप चांगले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव आणि अविनाश फडतरे यांचे तसेच इतर सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अत्यंत महत्त्वाचे काटेकोर नियोजन आणि सहकार्य आहे. सर्वांनी एकत्र मिळून नियम पाळले आणि संयम ठेवला तर आपण या संकटावर मात करणार आहोत, हे निश्चित आहे.