चतुरस्त्र व्यक्तीमत्त्व – रवींद्र बेडकिहाळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चतुरस्त्र व्यक्तीमत्त्व, अजात शत्रू व कल्पक व्यक्तीमत्त्व म्हणून आपली वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. गेली ५० वर्षेआपण आपल्या कार्यकर्तृत्त्वाने फलटणच्या ऐतिहासिक भूमीत ‘एकला चलोरे’ या भुमिकेतून जे काम हातात घेईल ते निष्ठेने करणे एवढेच तत्त्व अवलंबून आपला आजपर्यंतचा संघर्षमय जीवनप्रवास सुरु आहे.आई – वडीलांच्या शिक्षकी संस्काराच्या शिदोरीवर वाटचाल करताना त्या वाटेने न जाता नवीन वाटेने आपण वाटचाल करीत राहीलात. आपल्या बुद्धी कौशल्यावर आपण एखाद्या मोठ्या शहरामध्ये अत्यंत व्यवस्थितपणे स्थिरावला असता. परंतू शांतपणे जगणे हा आपला स्वभावधर्म नसल्यामुळेच बहुदा आपण पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रासह इतर क्षेत्राकडे आकर्षित झालात. खरंतर आपला मुळचा पींड हा पत्रकारितेचा आहे. परंतू पत्रकारितेमध्ये ही आपण आपल्या लेखणीच्या ताकदीवर एखाद्या मोठ्या वृत्तपत्राच्या आश्रयाखाली मोठे झाला असता परंतू, तसे न करता स्वत:चे ‘लोकजागर’ हे वृत्तपत्र सुरु केले व ते गेली ४३ वर्षे अखंडपणे आपण सुरु ठेवले आहे. पत्रकारितेमधून आपण आजवर अनेकवेळा समाजमनाच्या व्यथा मांडून त्यांना न्याय देखील मिळवून दिला आहे.
आजपर्यंतच्या आपल्या जीवनप्रवासात आपला स्थितप्रज्ञ व संयमी स्वभाव यामुळे अनेक दिग्गजांशी आपण निस्वार्थी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केलेले आहेत.

आपण फलटणमधून सुरु केलेले कार्य आज संपूर्ण राज्यभर पोहचले आहे. ग्रामीण भागातील विशेषत: प्रत्यक्ष घटनेवर काम करणारा लहानातला लहान, संपादक, पत्रकार, वार्ताहर हा आपला जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. या विचारातूनच आपण ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ या संस्थेची स्थापना ३५ वर्षांपूर्वी पत्रकारितेतील धुरंदर पत्रकार व पत्रकारांच्या प्रस्थापित संस्था यांचा विरोध पत्करुन केली. कारण प्रस्थापित संस्थांमध्ये आपल्या मते ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांचा फारसा विचार केला जात नव्हता. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेस स्थिरता लाभू नये यासाठीही अनेकांनी प्रयत्न केले. परंतू आपण आपल्या स्वभाव वैशिष्ठ्याप्रमाणे न डगमगता समर्थपणे आपले काम चालूच ठेवले. याच संस्थेच्या माध्यमातून आपण आपल्या संशोधनात्मक वृत्तीमुळे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य समाजापुढे आणले. बाळशास्त्रींचे पहिले राष्ट्रीय स्मारक त्यांच्या जन्मगावी पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे आपल्याच संकल्पनेतून उभे राहिलेले आहे.याही कामातील संघर्ष व अडथळ्याचीं शर्यत आता आपण पार केलेली आहे. आज बाळशास्त्रींचे स्मारक मोठ्या दिमाखात येथे उभे आहे व स्मारकाच्या माध्यमातून आज या गावाचा विकास होऊन महाराष्ट्राच्या नकाशावर पोंभुर्ले हे गाव नावारूपास आले आहे.

पत्रकार कल्याण निधी या संस्थेच्या माध्यमातून आचार्य बाळशास्त्री यांच्या कार्याची दखल शासनालाही आपण दरवर्षी पत्रकार दिनी (दि. ६जानेवारीला) सर्व वृत्तपत्रातून जाहिरात स्वरुपात अभिवादन करून घ्यायला लावली आहे.शासनाच्या महापुरुषांच्या अभिवादन यादी मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाचा समावेश करून दरवर्षी दिनांक २० फेब्रुवारी रोजी जयंती निमित्त शासनाच्या प्रत्येक कार्यालया त्यांना अभिवादन केले जाते.तसेच शासनाच्या जेष्ठ पत्रकारांना द्यावयाच्या मासिक सन्मान योजनेस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. शासनाने बाळशास्त्री यांच्या नावे राज्यातील जेष्ठ पत्रकार यांना दर्पण पुरस्कार देण्यास सुरवात केली आहे.महराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेच्या माध्यमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या नावे आपण पत्रकारांच्या कार्याचा गौरव म्हणून सुरु केलेले दर्पण पुरस्कार हे आज ही २९ वर्षं अविरतपणे सुरु आहेत ही गौरवास्पद बाब आहे.

बाळशास्त्री यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन फलटणमध्ये त्यांचेच नावाने महात्मा एज्युकेशन सोसायटी च्या माध्यमातून सन १९९७ पासून माध्यमिक विद्यालय देखील आपण सुरु केलेले आहे. या २५ वर्षा मध्ये या विद्यालयात समाजातील सर्वच स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी झालेले आहेत.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून व अन्य संस्थांच्या सहकार्याने आपण पत्रकारांसाठी विशेषत: लहान व जिल्हा वृत्तपत्रांसाठी शासनाच्या विविध समित्यांच्या माध्यमातून वृत्तपत्रांच्या व पत्रकारांच्या जीवनामध्ये आर्थिकस्थिरता कशी लाभेल यासाठी आजही प्रयत्नशील आहात.महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेचा रौप्यमहोत्सव समारंभात देशाचे कृषिमंत्री ना.शरद पवार यांनी आपल्या कार्याची दखल घेताना,‘‘ग्रामीण पत्रकारांबद्दलची रविंद्रची असणारी तळमळ व त्यांचे प्रश्ना सोडविण्यसासाठी त्याची सुरु असणारी धडपड आपण गेली २५ वर्षेजवळून पाहत असून रविंद्र लहान वृत्तपत्र व पत्रकार यांच्या प्रश्नां बाबत जाणते पत्रकार आहेत.’’असे गौरवोद्गार काढून आपल्या कार्याची पोहोच पावती दिलेली आहे.

पत्रकारितेबरोबरच साहित्य क्षेत्रातही आपले कार्य मोठे आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून सातारा जिल्हा प्रतिनिधीपदी निवड झाल्यापासून आपण जिल्ह्यात साहित्य चळवळ उभी राहावी व रुजावी यासाठी विशेष प्रयत्न करुन जिल्ह्यात अनेक साहित्य परिषद शाखा सुरु केलेल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील साहित्यिक व कवी यांच्या अपूर्ण अवस्थेत असणार्यास स्मारक कार्यात लक्ष घालून विशेषत: मर्ढे येथील कवीवर्य बा.सी.मर्ढेकर स्मारक पूर्ण होण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केलेले आहेत.फलटण साहित्य परिषदेच्या माध्यमातून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित केलेले विभागीय मराठी साहित्य संमेलन व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त फलटणमध्ये यशस्वीपणे पार पडलेले मराठी साहित्य संमेलनाचे आयोजनामुळे, संमेलनातील साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे निश्चियतच फलटणच्या सांस्कृतिक उंचीत वाढ झालेली आहे.तसेच नवोदित साहित्यिक व कवींना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संधी उपलब्ध करून दिलेली आहे.तसेच नवोदित लेखकांना प्रेरित करून त्यांच्या नवीन साहित्यविषयक कलाकृती प्रकाशित केलेल्या आहे.सध्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून काम करताना तेथेही शासनाच्या अनेक साहित्य विषयक योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या साहित्यिकांला मिळावा ही आपली भूमिका आहे. व तशी अनेकांना आपण संधी उपलब्ध करून दिली आहे.
देशातील नामवंत अशा भारती विद्यापीठ,पुणे चे तसेच रयत शिक्षण संस्थेचे सदस्य आहात. या दोन्ही संस्थांमध्ये आपण अनेक गरीब विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत मिळणेकामी मदत करुन त्यांना उच्चशिक्षित केले आहे.

आपल्या स्वभावाचे एक वैशिष्ठ्य असे आहे की, बरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाला मग तो संस्थेतील सेवक असला तरी त्याला आपलेपणाच्या भावनेतून मान सन्मान देता.सेवकाचा संस्थेच्या हितासाठी एखादा विचार योग्य असेल तर तो देखील अंमलात आणता. त्यामुळेच आपल्याबरोबर काम करताना आमच्या मनात संस्थाचालक – सेवक अशी भावना कधीही नसते. प्रामाणिकपणे, योग्य पद्धतीने काम करणार्याीची दखल आपण नेहमीच घेता व त्याला आपल्या बरोबरीने काम करण्याची संधी देता. हा आपला म्हणूनच आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीवर एवढेच म्हणावं वाटत,याही वयात तुमचं उत्साही व्यक्तीमत्त्व आणि संयमी व्यक्तिमत्व, कामातील प्रसन्नता आम्हाला आमचे खुजेपणा विसरायला लावतं आयुष्यात आम्हाला अनेक भेटले,पण तुमच्या प्रदीर्घ काळाच्या सहवासात आम्हाला तुमच्या रुपाने आश्रयस्थान लाभले आहे.

– अमर शेंडे,
शाखा कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखा
9922778386


Back to top button
Don`t copy text!