
स्थैर्य, सातारा, दि.28 ऑक्टोबर : संगम माहूली येथील कैलास स्मशानभूमीत सातारा शहर व लगतच्या 15 ग्रामपंचायती तसेच कोरेगांव येथील मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. सातारा शहर तसेच 15 ग्रामपंचायतीच्या हद्दीत शववाहिन्यांची संख्या अपुरी आहे. बर्याचवेळा शववाहिनी उपलब्ध होण्यासाठी विलंब लागत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याचा विचार करून श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नवीन शववाहिनी खरेदी करण्यात येणार आहे. याकरिता दानशूर व्यक्तींनी श्री बालाजी ट्रस्टकडे देणगी द्यावी, असे आवाहन श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी केले आहे.
राजेंद्र चोरगे म्हणाले, संगम माहूली येथे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकसहभागातून 22 वर्षापूर्वी कैलास स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. या स्मशानभूमीची देखभाल श्री बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून गेली 22 वर्ष अविरतपणे सुरू आहे. या स्मशानभूमीसाठी कोणतेही शासकीय, निमशासकीय अनुदान मिळत नाही. कैलास स्मशानभूमीमध्ये सातारा शहर, आजूबाजूचा परिसर,15 ग्रामपंचायत आणि कोरेगांव येथील मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. आजपर्यंत कैलास स्मशानभूमीमध्ये 32 हजार 653 एवढे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
मृत व्यक्तीला कैलास स्मशानभूमीपर्यंत अंत्यसंकारासाठी आणण्याकरिता शववाहिनीचा वापर करण्यात येतो. 2023 पर्यंत सातारा शहरातील वेगवेगळ्या संस्थेमार्फत 7 शववाहिनी कार्यरत होत्या. परंतु त्यातील 3 शववाहिन्या वेगवेगळ्या कारणाने बंद झाल्या आहेत. सध्या फक्त 4 शववाहिन्या कार्यरत आहेत.
वाढती लोकसंख्येचा विचार करता सातारा शहर तसेच 15 ग्रामपंचायतीच्या हद्दीत शववाहिन्यांची संख्या अपुरी आहे. बर्याचवेळा शववाहिनी उपलब्ध होण्यासाठी विलंब लागत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याचा विचार करून श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नवीन शववाहिनीची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी दानशूर व्यक्तींनी श्री बालाजी ट्रस्टकडे देणगी देण्याचे आवाहन श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, संजय कदम, जगदीश खंडेलवाल, अंबाजी देसाई, उदय गुजर, नितीन माने, दीपक मेथा, संजय निकम संतोष शेंडे, हरिदास साळुंखे, जगदीप शिंदे यांनी केले आहे. अधिक माहिती व देणगी देण्यासाठी मोबा. 9422603625 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

