स्थैर्य, पारनेर, दि. २७: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची हत्या प्रकरणात पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी १,५०० पानांचे आरोपपत्र (दोषारोपपत्र) शुक्रवारी पारनेर न्यायालयात सादर केले. जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही फरार असल्याने त्याच्याविरोधात त्याला अटक करण्यात आल्यानंतर स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याचे अजित पाटील यांनी सांगितले.
गेल्या वर्षी ३० नाहेंबर रोजी नगर-पुणे मार्गावर तालुक्यातील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जरे यांच्या आईने फिर्याद दाखल केल्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला. जरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांपैकी एकाचे छायाचित्र जरे यांच्या मुलाने काढले होते. त्यावरून पोलिसांनी दोघाही आरोपींना जेरबंद केले. यानंतर आणखी तिघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत बाळ बोठे हा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पुढे आली. बाळ बोठेने सागर भिंगारदिवे मार्फत जरे यांच्या हत्येेची सुपारी दिली होती. त्यानंतर ‘मोबाइल सीडीआर’वरून रेखा जरे यांच्या हत्येचा बोठे हाच सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, मुख्य सूत्रधार बोठे अद्याप फरार आहे.
यांच्याविरुद्ध आरोपपत्र
रेखा जरे हत्येप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या ज्ञानेश्वर ऊर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रूक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
बोठेसमोर उरले दोनच पर्याय
सत्र न्यायालय, उच्च न्यायालयाने बोठेचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत. आता जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करणे अथवा पोलिसांना शरण येणे एवढे दोन पर्याय बोठेसमोर आहेत. पारनेर न्यायालयाने यापूर्वीच बोठेविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी केले आहे. या निर्णयाला जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देणारा बोठेने केलेला अर्ज फेटाळत पारनेर न्यायालयाने जारी केलेले स्टँडिंग वॉरंट जिल्हा सत्र न्यायालयाने कायम केले.