सत्ताधारी शिवसेनेच्या गुंडगिरीमुळे राज्यात अराजक – भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा आरोप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ एप्रिल २०२२ । मुंबई ।  सत्ताधारी शिवसेनेच्या दहशतीमुळे राज्यात अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या या गुंडगिरीविरुद्ध भारतीय जनता पार्टी लोकशाही मार्गाने लढा देईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील लोकप्रतिनिधींनी शनिवारी दिला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष आ.मंगल प्रभात लोढा, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ.आशिष शेलार, भाजपा मुंबई प्रभारी आ.अतुल भातखळकर आदींनी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी शिवसेनेच्या दहशतीविरोधात हल्लाबोल चढविला.

श्री.दरेकर म्हणाले की, मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सुरु केलेल्या पोलखोल यात्रेवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ले चढविले. शुक्रवारी मोहित कंभोज यांच्या वाहनावर हल्ला चढविला गेला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचीही गुंडगिरी पोलीस यंत्रणा निमूटपणे पाहत बसली आहे. पोलखोल यात्रेत अडथळे आणण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ही यात्रा सुरूच राहील. मुंबईत व राज्यात सुरु असलेला राज्य सरकार पुरस्कृत दहशतवाद आजवर महाराष्ट्राने पाहिला नव्हता. या हिंसाचाराला जशास तसे उत्तर भाजपा कार्यकर्ते देऊ शकतात. मात्र आम्ही या विरोधात पोलीस आयुक्तांकडे दाद मागून लोकशाही मार्गाने लढा देऊ असेही श्री.दरेकर यांनी सांगितले.

आ.आशिष शेलार म्हणाले की, मोहित कंभोज यांच्यावरील हल्ला हे नामर्दपणाचे लक्षण आहे. कंभोज यांच्यावर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी आपणही एकटे फिरणार आहोत हे ध्यानात ठेवावे. राज्यात सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने अराजक निर्माण केले जात आहे. आम्ही कायद्याचे पालन करूच, पण या गुंडगिरीला सरकारने आवर न घातल्यास जशास तसे उत्तर देण्याचीही आमची तयारी आहे’ असा इशाराही आ. शेलार यांनी दिला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी आंदोलकांना तातडीने पकडले गेले. त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल झाले. पोलखोल यात्रेवरील हल्लेखोर व राणा दाम्पत्याच्या घरावर हल्ला करणारे मात्र मोकाट आहेत. हल्लेखोरांना वेगळा न्याय का असा सवालही त्यांनी केला. भाजपा मुंबई अध्यक्ष आ.मंगलप्रभात लोढा म्हणाले की, सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी सुरु केलेली पोलखोल यात्रा यापुढेही चालूच राहील. या दहशतवादाविरोधात आम्ही पोलीस आयुक्तांकडे दाद मागू. गृहमंत्र्यांनाही भेटण्याचा प्रयत्न करू. शिवसेनेच्या भ्रष्टाचारा विरोधातील लढाईत भाजपाला मुंबईकर साथ देतील असा विश्वास ही आ.लोढा यांनी व्यक्त केला. यावेळी खा. मनोज कोटक, प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड, योगेश सागर, तमिल सेल्वन, मनीषा चौधरी, अमित साटम, पराग आळवणी,  राहुल नार्वेकर आदी आमदार उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!