श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गोंदवलेत रविवारी वाहतुकीत बदल

महोत्सवाचा रविवार मुख्य दिवस; सहकार्य करण्याचे आवाहन


स्थैर्य, सातारा, दि. 13 डिसेंबर : श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या मुख्य दिवशी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन येथे वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले आहेत. रविवारी (ता. 14) मध्यरात्रीपासून रात्रीपर्यंत हा बदल करण्यात येणार आहे.

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा 112 वा पुण्यतिथी महोत्सव पाच डिसेंबरपासून येथे सुरू आहे. दहा दिवस चालणार्‍या या महोत्सवानिमित्त येथील समाधी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. महोत्सवाचा मुख्य दिवस रविवारी (ता. 14) असून, पहाटे पाच वाजून 55 मिनिटांनी ’श्रीं’च्या समाधीवर गुलाल-फुलांची उधळण होणार आहे. या कार्यक्रमासाठी शनिवारी दुपारपासूनच भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ’श्रीं’चे समाधी मंदिर सातारा लातूर महामार्गालगत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गेवळविण्यात येणार आहे.

शनिवारी रात्री एक ते रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत पिंगळी (खांडसरी चौक) पासून गोंदवल्याकडे येणारा व गोंदवल्यातील मुख्य चौकापासून पिंगळीकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक सातार्‍याकडून अकलूजकडे जाण्यासाठी पिंगळी (खांडसरी चौक) ते दहिवडीमार्गे राणंद माडींवरून म्हसवडकडून वळविण्यात येणार आहे. पंढरपूर बाजूकडून सातार्‍याकडे जाण्यासाठी म्हसवड ते मायणीमार्गे किंवा म्हसवड ते शिंगणापूर, फलटणमार्गे सातारा असा वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. सोमवारपासून पूर्ववत वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती दहिवडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली. या वाहतूक मार्गातील बदल लक्षात घेऊन वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

महेश काळे यांचे गायन..

‘श्रीं’च्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांचे गायन समाधी मंदिरात होणार आहे. शनिवारी (ता.13) सायंकाळी पाच वाजता येथील ब्रह्मानंद मंडपात हा कार्यक्रम होईल.


Back to top button
Don`t copy text!