निमसोड : जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आबासाहेब जाधव, सौ. शशिकला जाधव यांचा सत्कार करताना समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष शंकर देवरे व इतर मान्यवर. (छाया : समीर तांबोळी)
स्थैर्य, कातरखटाव, दि.६: खटाव तालुक्यात प्राथमिक शिक्षक समितीने मजबूत संघटन करण्याबरोबर विधायक उपक्रमावर भर दिल्याने आगामी काळात परिवर्तन अटळ आहे असे प्रतिपादन संघटनेचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केले.
निमसोड (ता. खटाव) येथे आयोजित केलेल्या शिक्षक स्नेह मेळावा व गुणवंतांच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष शंकर देवरे, उपाध्यक्ष संजय नागरे, कोषाध्याक्ष विठ्ठल फडतरे, शिक्षक बँकेचे संचालक सुभाष शेवाळे, शिवाजी शिंदे, किरण यादव, अरूण पाटील, फलटण तालुकाध्यक्ष श्री. कदम, अनिल चव्हाण, अनिल पिसाळ, विठ्ठल माने, नितीन शिर्के, गणेश तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, विरोधकांतील अंतर्गत गटबाजीमुळे समोरचे कार्यकर्ते दिशाहीन झाले आहेत. शिक्षक समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विधायक उपक्रमांचा प्रभाव तरुण कार्यकर्त्यावर पडत असल्याने दिवसेंदिवस आपल्याकडे ओढा वाढत आहे. खटाव तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे. त्याचबरोबर समितीच्या संस्थापकांचा तालुका म्हणून या तालुक्याकडे पाहिले जाते. या तालुक्याने एखादी दिशा घेतली की त्याचे पडसाद संपूर्ण जिल्हाभर पडतात.
संचालक चंद्रकांत मोरे यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष अर्जुन यमगर, सरचिटणीस नवनाथ जाधव यांनी स्वागत केले.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील कवी, लेखक, गझलकार यांचा साहित्य क्षेत्रातील योगदानाबाबत गुणगौरव करण्यात आला. त्यामध्ये विजया सणगर, अनुराधा गुरव, रंजना सानप, सिमा मंगरूळे, बाळासाहेब कांबळे, किरण अहिवळे, महेश मोरे (स्वच्छंदी), गणेश तांबे तसेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आबासाहेब जाधव व शशिकला जाधव यांचा समावेश आहे. तर स्नेह मेळाव्यात पोपटराव घाडगे, संतोष डोंबे व गणेश दुबळे यांनी आपल्या सहकार्यांसह शिक्षक समितीत प्रवेश केला. आबासाहेब जाधव, महेश मोरे यांनी सुत्रसंचालन केले. शिवनाथ लखापते यांनी आभार मानले.