
दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार महाविद्यालयीन अभ्यासक्रमातील होऊ घातलेले बदल ही काळाची गरज बनली असून, महाविद्यालयीन शिक्षकांनी त्यासाठी स्वतःला तयार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य प्रो. डॉ. सुनील बनसोडे यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय फलटण व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बी. ए. भाग २ हिंदीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारीत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार, दि. २१/१०/२०२३ रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटक व बीजभाषक म्हणून प्रो. डॉ. सुनील बनसोडे उपस्थित होते.
कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना डॉ. बनसोडे पुढे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य आधारित शिक्षणाला जास्त महत्त्व दिले असून येथून पुढे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम बनविताना या बाबींचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणे बंधनकारक झाले आहे. आपल्या बीज भाषणात त्यांनी पुनर्रचित अभ्यासक्रमातील सर्व घटकांचे विवेचन करून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून लागू होणार्या बी.ए. भाग १ च्या अभ्यासक्रम आराखड्याविषयी उपस्थितांना माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रमाबरोबरच आजच्या तरुण पिढीसाठी नैतिक मूल्यांचे शिक्षणही आवश्यक असून हिंदी, मराठी व इंग्लिश या भाषा शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये समाजातील वास्तविक घटनांचे चित्रण केलेले असल्याने ते मूल्य शिक्षणासाठी उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन करून व्यावसायिक शिक्षणाबरोबरच गुणात्मक शिक्षणही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यशाळेसाठी सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून सहभागी झालेल्या प्राध्यापकांचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांनी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करून कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषद व मुधोजी महाविद्यालय फलटण यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे हस्तांतर देखील करण्यात आले. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ. साताप्पा सावंत व महाविद्यालयाचे कला शाखाप्रमुख प्रो. डॉ. अशोक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यशाळेचे संयोजक हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. नितीन धवडे यांनी उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. सविता नाईक निंबाळकर यांनी उद्घाटन सत्रातील मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.
प्रथम सत्रामध्ये प्रा. डॉ. क्षितीज धुमाळ, प्रो. डॉ. वर्षारानी सहदेव, प्रा. डॉ. मनीषा जाधव यांनी विषय तज्ञ म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सुधारीत अभ्यासक्रमातील प्रथम सत्रातील घटकांचे विवेचन व विश्लेषण केले. तसेच प्राध्यापकांना अध्यापनासंबंधी काही महत्त्वाची तंत्रे सांगितली. शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ. साताप्पा सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अभ्यासक्रम बनविताना कोणकोणत्या बाबींचा विचार केला जातो, याविषयी विवेचन करून अंतर्गत मूल्यमापनासंबंधी मार्गदर्शन केले. या सत्रातील साधन व्यक्तींचा परिचय प्रा. डॉ. परशुराम रगडे यांनी करून दिला. मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. जितेंद्र बनसोडे यांनी मानले.
द्वितीय सत्रामध्ये प्रा. डॉ. गजानन चव्हाण व प्रा. डॉ. संग्राम शिंदे यांनी द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमाचे घटकानुरूप विवेचन करून अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या बाबींकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. या सत्राचे अध्यक्ष प्रो. डॉ. भानुदास आगेडकर यांनी विषय तज्ञांच्या विवेचनाचा आढावा घेऊन अभ्यासक्रम अध्यापनाबाबत मार्गदर्शन केले. या सत्रातील साधन व्यक्तींचा परिचय प्रा. डॉ. शिवाजी चवरे यांनी करून दिला. मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार प्रा. किरण सोनवलकर यांनी मानले.
समारोप सत्रामध्ये सहभागी प्राध्यापकांनी पुनर्रचित अभ्यासक्रम, अंतर्गत मूल्यमापन व अध्यापनाबाबत आपल्या शंका व सूचना मांडल्या. मान्यवरांनी या शंकांचे निरसन करून त्यांच्या सूचनांची विशेष दखल घेतली. समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगावचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित होते. त्यांनी पुनर्रचित अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या घटकांविषयी मार्गदर्शन केले. समारोप सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. संजय दीक्षित यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात होऊ घातलेले बदल व त्यामुळे आपणापुढे उपस्थित होणारी आव्हाने व संधी याविषयी आपले मत मांडले. सहभागी प्राध्यापकांमधून प्रा. डॉ. सिराज शेख व प्रा. डॉ. भारत उपाध्ये यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कार्यशाळेच्या आयोजनाबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून कार्यशाळेच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. या सत्रातील प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. रमेश बोबडे यांनी करून दिला. प्रा. संजय जाधव यांनी मान्यवरांचे, उपस्थितांचे व कार्यशाळेच्या आयोजनासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले.
कार्यशाळेसाठी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयातील सुमारे ८० प्राध्यापक सहभागी झाले होते. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेच्या उद्घाटन व प्रथम सत्राचे सूत्रसंचालन प्रा. शौकत आतार यांनी केले. द्वितीय व समापन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मच्छिंद्र कुंभार यांनी केले.