दैनिक स्थैर्य । दि.०५ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । विधान परिषद व शिक्षक परिषद या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या समर्पित आणि निस्पृह नेत्या संजीवनी रायकर यांच्या निधनाने राज्यातील शिक्षण क्षेत्राचे अपरिमीत नुकसान झाले आहे, अशी श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी अर्पण केली.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, संजीवनी रायकर यांनी १९८० च्या दशकात शिक्षिका असताना भारतीय जनता पार्टीचे कार्य सुरू केले. शिक्षकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शिक्षक परिषदेची स्थापना आणि विस्तारात त्यांचा सिंहाचा वाटा होता. १९८८, १९९४ व २००० साली त्या सलग तीन वेळा मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आल्या. विधान परिषद सदस्य म्हणून काम करताना तसेच शिक्षक परिषदेमध्ये प्रदेश आणि देशपातळीवर नेतृत्व करताना संजीवनी रायकर यांनी शिक्षकांचे शेकडो प्रश्न सोडविले. शिक्षक परिषदेसोबत वात्सल्य अनाथालयाच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले होते. त्या उत्तम शिक्षिका होत्या. त्यांनी आयुष्यभर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचा ध्यास घेतला होता. आपण त्यांना भाजपा, महाराष्ट्रतर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.