स्थैर्य, अमरावती, दि.५: राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलीस मारहाण प्रकरणी तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा भाजपा स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिवसा येथे दिला. अमरावती जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात तिवसा येथे आंदोलन करण्यात आले.
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी मागील काही दिवसांपासून भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात गुरुवारी तिवसा येथे आंदोलन करण्यात आले. दरम्यान यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेतला तर काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे यशोमती ठाकुरांचा राजीनामा घेत नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली असताना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नसून नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे चंद्रकांत पाटील म्हणाले .
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी 2012 मध्ये एका पोलीस कर्मचा-याला मारहाण केली होती. याप्रकरणी अमरावतीच्या न्यायालयाने त्यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे. यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा, यासाठी भाजपाकडून आंदोलन केले जात आहे.