स्थैर्य, वाई, दि.३ : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशिवायही अनेक विषय आहेत. चंद्रकांत पाटील मात्र पुण्याच्या, कोल्हापूरच्या की राज्याच्या राजकारणात रहायचे की परत जायचे याविषयीच्या चर्चेत राहून स्वतःला सीमित करत आहेत. परंतु खरे म्हणजे त्यांना खऱ्या विश्रांतीची गरज आहे असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे बेंगलोर महामार्गावर जोशीविहिर (ता वाई) येथे सातारा जिल्हा बँकेच्या एटीएम सेंटरचे उदघाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले,जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे,संचालक नितीन पाटील,शशिकांत पिसाळ,धनंजय पिसाळ आदी उपस्थित होते.
करोना प्रदुभाच्या झालेल्या परिणाममातून बाहेर पडून सरकार आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष जबाबदारीने विकासाला गती देण्याचे काम करीत आहेत असे असताना सगळीकडे गेल्यावर पत्रकार देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असे म्हणाले याविषयी मत विचारत असतात.मात्र देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशिवायही राज्यात अनेक विषय आहेत.त्यामुळे आम्ही राज्याच्या महत्वाच्या विषयांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.राज्य सरकारचे एक वर्ष करोना आपत्तीतून बाहेर पडण्यात गेले आहे. त्यामुळे सरकार आता पूर्ण गतीने कामाला लागले आहे.महाविकास आघाडीच्या घटक पक्षात चांगला समन्वय आहे.राज्यात अनेक वर्षे धरणांची व उपसा सिंचन,कालव्याची कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांना चालना देण्याला आमचे प्राधान्य आहे.चंद्रकांत पाटील यांनी वर्तमानपत्रात छापणाऱ्या बातम्यांच्या भाषेला संपादकांना पत्र लिहून आक्षेप घेणार असल्याचे म्हंटले आहे.ते कोणता मुद्दा घेऊन बोलतात तो मुद्दाच मला माहीत नाही आणि त्यांचा विषयी लिहिलेलं मी काही वाचलेलं नाही आणि मी त्याच्या विषयापुरतं सीमित राहू इच्छित नाही. रोज काय तरी बोलून चर्चेत ठेवण्यापेक्षा त्यांना खऱ्या विश्रांतीची गरज आहे.मिलिंद एकबोटे,संभाजी भिडे यांच्या विषयी जे पुरावे पुढे येतील त्यानुसार त्यांच्यावर काय कारवाई करणार ते त्या विभागाचे मंत्री सांगू शकतील.महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे.त्यामुळे लोकांमध्ये कोणताही संभ्रम नाही.खरा संभ्रम विरोधकांमध्येच आहे त्यांना मुद्दे सापडत नसल्याने फडणवीस आणि पाटील एव्हढाच विषय दिसत आहे परंतु राज्यासमोर यांच्याशिवायही अनेक विषय आहेत.त्यावर तर आम्हीच काम करत आहोत.