स्थैर्य, मुंबई, दि.१४: ‘महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय’ असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.
‘महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय. महाराष्ट्रात विकास होईल अशी वेडी आशा भोळी बाभडी जनता करत आहे, परंतु विकास करण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे आहे ते मंत्री कोणत्या ना कोणत्या तरी घोटाळ्यात व कारनाम्यात फसले आहेत. असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
- पुण्यात पूजा चव्हाणच्या आत्महत्येत ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचे नाव सध्या झळकत आहे. मंत्र्यांचे तरुणीसोबत अनैतिक प्रेम संबंध होते आणि त्यांनी विश्वासघात केल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली अशी माहिती प्रसिध्दी माध्यमांवर येत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकार मधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले आणि त्यांनीच स्वतः आपले अनैतिक संबंध आणि मुलं असल्याच्या भानगडीची कुबली दिली.
- संपूर्ण राज्यात या मुद्द्यावर निदर्शने झाली तरीही त्या भानगडीबाज मंत्र्यांनी अद्यापही राजीनामा दिला नाही. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकार मधील कॅबिनेट मंत्र्यांच्या जावयाला ED ने ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. तर एका कॅबिनेट मंत्र्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. आणखी एक मुजोर कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या विरोधातील एक फेसबुक पोस्ट सहन न झाल्यामुळे एका इंजिनिअर युवकाला बेदम मारहाण केली होती आणि स्वतः ते मंत्री मारहणीच्यावेळी उपस्थित होते.
- ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री यांच्या मतदारसंघात सतत हिंदू कुटुंबांना पळवून लावले जात आहे आणि हिंदूंचा सर्वेसर्वा म्हणवणारी म्हणवणा-या शिवसेनेने सत्तेसाठी तोंडावर लाचारीची पट्टी लावली आहे. ठाकरे सरकार प्रत्येक टप्प्यात अपयशी झाले आहे. जनतेने भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला कौल दिला होता. परंतु छुप्या दरवाजाने घुसलेल्या शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस ने अनैसर्गिक सरकार बनवून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे.