
दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे यांनी मिळवलेला हा विजय महत्वपूर्ण आहे. त्यामुळं त्यांचा सत्कार करण्यासाठी आज इथं आलो होतो. आगामी नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी भावना आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मतही विचारात घेतलं जाईल. या याबतचा निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज आंबेघर येथे दिली.
आंबेघर येथे जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, भाजपचे जिल्हा चिटणीस विठ्ठल देशपांडे, गीता लोखंडे, नगरसेवक विकास देशपांडे दत्तात्रय पवार, तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, हरिभाऊ शेलार, मच्छिंद्र क्षीरसागर, बबनराव बेलोशे, जयदीप शिंदे, सागर धनावडे, अंकुश बेलोशे, शिवाजीराव गोरे, भानुदास ओंबळे, सानिया धनावडे, सुरेखा धोत्रे, प्रशांत करंजेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा बँकेवर जावळी सोसायटीच्या हाय होल्टेज लढतीत ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. त्यामुळं त्यांचा सत्कार करण्यासाठी मुद्दाम आलो आहे. सामान्य कुटुंबातील रांजणे यांचा विजय हा महत्वपूर्ण असल्याने त्यांचा सत्कार भाजपच्या वतीने आज करण्यात आला. मी विद्यार्थी चळवळीतून पुढे आलो असून संघर्ष करण्याऱ्या व्यक्तींचे मला अप्रुप आहे. त्यामुळं मी आज रांजणे यांचा सत्कार करण्यासाठी आलो आहे.चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, राज्य सरकार योग्य वेळ आल्यावर निश्चित पडेल. जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका भाजपनं स्वबळावर लढाव्यात, असा आग्रह आहे. मात्र, याबाबत काय निर्णय घ्यायचा हे स्थानिक पातळीवर असलेले कार्यकर्ते यांचे मत घेऊन ठरवलं जाईल. भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष होण्यासाठी पक्षाच्या चिन्हावर लढाव्यात, अशी भूमिका आहे. प्रारंभी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रांजणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.