
स्थैर्य, सातारा, दि.६ : सातारा नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी मनोज शेंडे यांची ऑनलाइन झालेल्या सभेत बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेत येऊन मनोज शेंडेंचे अभिनंदन केले.
सातारा पालिकेसाठी 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत सातारा विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून माधवी कदम या निवडून आल्या होत्या. उदयनराजेंनी आतापर्यंत राजू भोसले, सुहास राजेभोसले, किशोर शिंदे यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. शिंदेंचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी नगराध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. या पदासाठी मनोज शेंडे यांचे नाव चर्चेत होते. त्यासाठी जलमंदिरात गेल्या काही दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू होते. कामाचा अनुभव, उत्तम राजकीय समन्वय आणि करंजे ग्रामीण भागाच्या राजकीय बांधणीसाठी मनोज शेंडे यांच्या नावाला “साविआ’ने पसंती दिली.
गुरुवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत होती. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी अर्जाची छाननी केली. पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षांनी मनोज शेंडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची उपाध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर माधवी कदम, किशोर शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन शेंडेंचा सत्कार केला.
यापूर्वी शेंडे यांनी बांधकाम सभापतिपदी काम केले आहे. साताऱ्याची हद्दवाढ जाहीर झाली असून, पालिकेच्या निवडणुकीला केवळ एक वर्ष राहिले आहे. हद्दवाढीनंतर पालिकेत सात नवीन नगरसेवकांची भर पडणार आहे. हद्दवाढीमध्ये समाविष्ट भागांवर शेंडेंना विशेष लक्ष द्यावे लागेल.