खेलो इंडिया बीच गेम्स स्पर्धेत फलटणचा चैतन्य शिंदे ठरला ब्रॉंझ मेडलचा मानकरी


दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२५ । फलटण । गुजरात येथील घोगला दिव बीच येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकचे सिनियर ऑफिसर अजित शहाजी शिंदे यांचे सुपुत्र चैतन्य अजित शिंदे, रा.शिंदेवाडी ता.फलटण (सध्या राहणार विद्यानगर, फलटण) याने महाराष्ट्राचा झेंडा फडकवलेला आहे, त्याने दिव समुद्रात १० किलोमीटरचे अंतर २ तास १३ मिनिटात पार करीत तिसरा क्रमांक मिळवून महाराष्ट्रासाठी ब्राँझ मेडल पटकावले असून त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चैतन्य शिंदे सध्या क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी, पुणे येथे प्रशिक्षक बालाजी केंद्रे व विशाल नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे. चैतन्यने राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे या कामगिरीच्या जोरावर त्याची खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सागरी जलतरण स्पर्धेत १० व ५ किलोमीटर स्पर्धेसाठी निवड झाली होती.

बुधवार, दिनांक २१ मे २०२५ रोजी गुजरात येथील घोगला बीच दिव समुद्रात झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत १० किलोमीटरचे अंतर २ तास १३ मिनिटात पार करीत तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ मेडल पटकावले आहे. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजू पालकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

चैतन्यच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, हॉकी प्रशिक्षक व सेवानिवृत्त तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांनी चैतन्यचे कौतुक करुन अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!