दैनिक स्थैर्य । दि. २४ फेब्रुवारी २०२२ । सातारा । अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी शासनाच्या असणाऱ्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात. या योजना सातारा जिल्हा परिषदेने प्रभावीपणे राबविल्या असून अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी समाधान व्यक्त केले.
अनुसूचित जाती जमातींसाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा आढावा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेतला. या बैठकीला समितीचे सदस्य आर.डी. शिंदे, के.आर. मेढे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्चना वाघमळे, रोहिणी ढवळे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धनंजय चोपडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. अभ्यंकर म्हणाले, जिल्हा परिषदेमधील अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना शासनाने ज्या सोयी-सुविधा दिल्या आहेत, त्या उपलब्ध करुन द्या. तसेच शासनाच्या नियमानुसार पदोन्नतींची प्रकरणे मार्गी लावा.जिल्हा परिषदेला अनुसूचित जाती जमातींसाठी विविध योजनेंतर्गत निधी येतो, तो वेळेत खर्च करा.
अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांचे आर्थिकस्तर उंचविणाऱ्या विविध योजनांना जास्तीचा निधी मागा. विविध घरकुल योजनेंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे. सेवा निवृत्तीचे प्रकरणे अत्यंत कमी असल्याबद्दल श्री. अभ्यंकर यांनी जिल्हा परिषदेचे अभिनंदनही केले.
बैठकीच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या विविध कामकाजाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
या बैठकीमध्ये 28 फेब्रुवारी 2022 रोजी सेवा निवृत्त होणाऱ्या विजय ढोबळे,बापुराव वैराट व सुशिला दळवी यांचा सत्कारही अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले.