दैनिक स्थैर्य । दि. २१ नोव्हेंबर २०२२ । सातारा । महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा.फलटण यांनी श्रीराम एजुकेशन सोसायटी आणि सद्गुरू प्रतिष्ठान फलटण यांचे सहकार्याने शुक्रवार दिनांक २५ व शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी फलटण येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाचे हे दहावे वर्ष असून या दशकपुर्तीच्या व भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने महाविद्यालयीन वार्षिक नियतकालिक स्पर्धेचे आयोजन या वर्षी करण्यात आले.या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या पहिल्याच स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजच्या
‘शिवविजय-२०२१-२२’ या अंकास प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. या अंकाचे संपादक छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी केले आहे. याच स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे दर्जेदार लेखनाचे परीक्षण करून जे पुरस्कार जाहीर झाले त्यात ‘युवा कवी’ म्हणून प्रथम क्रमांक पुरस्कार छत्रपती शिवाजी कॉलेजची कवयित्री वैष्णवी गुजर हिला जाहीर झाला आहे.तसेच ‘युवा साहित्यिक’ म्हणून देण्यात येणाऱ्या पुरस्कारात छत्रपती शिवाजी कॉलेजच्या ग्रामीण कथेत विविध पुरस्कार मिळवणाऱ्या विनय कर्चे याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजने साहित्य लेखन स्पर्धेत आणि संपादन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सचिव, व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी शिवविजयचे संपादक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, संपादक मंडळ तसेच युवा कवयित्री वैष्णवी गुजर व युवा साहित्यिक विनय कर्चे यांचे अभिनंदन केले.
छत्रपती शिवाजी कॉलेजच्या ‘शिवविजय-२०२१-२२’ या अंकाचे वैशिष्ट्य हे की मुखपृष्ठ पासून ते मलपृष्ठ पर्यंत अंक सुंदर झालेला आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना छत्रपती शिवाजी कॉलेजचे देखील हे अमृत महोत्सवी वर्ष होते.त्या निमित्ताने मुखपृष्ठ अतिशय सूचक बनवलेले असून महात्मा गांधीजी व भगत सिंग यांचे फोटो घेऊन स्वातंत्र्य चळवळीतील दोन्ही प्रवाह दाखवण्यात आलेले आहे. स्वातंत्र्य चळवळ सुरु असतानाच रयत शिक्षण संस्थेचे शिक्षणाचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी निष्ठेने आणि तळमळीने चालू ठेवलेले होते यासाठी कर्मवीर अण्णांचा फोटो, कमवा आणि शिका योजनेतील कार्याचे प्रतीकात्मक चित्र याचा औचित्यपूर्वक मांडणी मुखपृष्ठात करण्यात आली आहे. स्वातंत्र्यचळवळीची फलश्रुती स्वातंत्र्य असली तरी एका नव्या लोकशाही व्यवस्थेची संरचना संविधान तयार करून देण्यात आली. त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान हातात घेतलेल्या पुतळ्याच्या फोटोचे प्रतीकात्मक चित्र घेतले असून संसदीय लोकशाही सुरु झाली हे दर्शवण्यासाठी डॉ,बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संसद व त्यावरील राष्ट्रीय तिरंगा ध्वज हे बोटाने दाखवत आहे असे दाखवण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्थेचा हिरवागार महावटवृक्ष व त्यावर मुक्तपणाने उडणारी पाखरे दाखवण्यात आली आहेत. परिणामकारक मुखपृष्ठ ,आर्टपेपर वर घेतलेले सुंदर फोटो, दोनोळी व चारोळी लिहून फोटोला साजेशे केलेले सर्जक लेखन, कॉलेजच्या स्थापनेच्या व वाटचालीतील निवडक आठवणी,वर्षातील प्रगतीचा ठळक आढावा घेणारे प्रकाशकीय, वाचनीय व अंकविशेष सांगणारे वेधक संपादकीय ,नेहरू यांचे पहिले भाषण.कॉलेज वाटचालीचा आढावा, विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या गुणवत्तेचा वेध ,प्रतापगडची मोटरसायकल रॅली याचे सुंदर शब्दात केलेले शब्दांकन, विनोदाची केलेली पेरणी.
विद्यार्थ्यांचे विविधांगी साहित्य,विद्यार्थिनी ,विजया आणि प्रियांका यांची साहित्याला साजेशी चित्रे ,योग्य अक्षरलिपी निवड,अहवाल, प्राध्यापक योगदान, विविध भाषा साहित्य, मनमोहक मलपृष्ठ, शांत आणि तजेलदार रंगांची निवड,मनोरंजन ,बोधपर व ज्ञान देणारे लेखन यामुळे अंक सर्वांग सुंदर झाला असून विद्यार्थ्यांना संवाद करण्यासाठी प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांचे मोबाईल देखील उपलब्ध करून दिले आहेत. अंक संपादनात डॉ.कांचन नलवडे, डॉ.सादिक तांबोळी,प्रा.रविंद्र महाजन, प्रा.डॉ.पोर्णिमा मोटे, प्रा.विजया गणमुखी, प्रा.उर्मिला तांदळे, प्रा.उषादेवी घाटगे, प्रा.जयराम सोनटक्के, प्रा.तायराशगुप्ता बागवान, विजया करंजे,प्रियांका मगरे, अक्षररचनाकार विजय लिपारे, ओकार पसरणीकर,मुद्रक डी.एस प्रिंटर्स,दशरथ रणदिवे,प्रबंधक डॉ.अरुणकुमार सकटे,अधीक्षक श्री.तानाजी सपकाळ यांचे सर्वांचे योगदान आहे. शुक्रवारी २५ नोव्हेंबर २२ रोजी कॉलेज प्रतिनिधी संपादक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,वैष्णवी गुजर व विनय कर्चे
यांचा सन्मान करून त्यांना संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांचे पारितोषिके दिली जाणार आहेत.