छ.शिवाजी कॉलेजच्या हिंदी विभागाचा तुषार भद्रेज ॲकॅडमीशी सामंजस्य करार संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । सातारा । रयत शिक्षण संस्थेचे, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा (स्वायत्त)या महाविद्यालयातील हिंदी विभाग व ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांनी स्थापन केलेल्या व नावलौकिक प्राप्त तुषार भद्रेज दास्तान ॲकॅडमी ऑफ आर्ट, सातारा यांच्यात पाच वर्षांसाठी सामंजस्य करार नुकताच  करण्यात आला. तुषार भद्रे यांची ॲकॅडमी गेली अनेक वर्षे सातारा शहरातील व महाराष्ट्रातील कलाकारांना प्रशिक्षण व व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे. महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व करिअरला वाव देण्यासाठी त्यांना कौशल्याधारित ज्ञान देण्यासाठी 'आवाज संवर्धन आणि संभाषण कौशल्य', 'चित्रकला फाउंडेशन कोर्स' व 'रेल्वे भरती परीक्षा मार्गदर्शन प्रमाणपत्र कोर्स' उत्तमपणे चालविले जातात. या कोर्सकरिता तुषार भद्रेज दास्तान ॲकॅडमी ऑफ आर्ट्स यांच्या अनुभवाचा, साधन-सामग्री व ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. तसेच हिंदी विभागाच्या वतीने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, चर्चासत्रे, परिसंवाद, हॅण्डस् ऑन ट्रेनिंग, विषयतज्ज्ञांची व्याख्याने, अभ्यास-सहली, प्रोजेक्ट व संशोधनपर निबंध लेखन इ. उपक्रम घेतले जातात. यासाठीही या ॲकॅडमीशी संबंधित विषयतज्ज्ञांची सहायता होणार आहे. तसेच तुषार भद्रे दास्तान ॲकॅडमी ऑफ आर्ट्स मध्ये आयोजित अभ्यास-शिबिरे, कार्यशाळा, कला, नाट्य व फिल्म महोत्सव यासाठी हिंदी विभागाचा प्राध्यापक वृंद, विद्यार्थी वर्ग ॲकॅडमीला सहायता करणार आहेत. तुषार भद्रे यांच्या मराठी व हिंदी रंगभूमी बाबतच्या दीर्घ अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे तसेच भद्रेज ॲकॅडमीमधील कलाकारांना हिंदी विभागातील प्राध्यापकांच्या ज्ञानाचा फायदा होणार आहे. हा करार करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्रिं. डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपप्राचार्य प्रो.डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. रामराजे माने- देशमुख, डॉ. रोशनआरा शेख यांनी सहकार्य केले. या सामंजस्य कराराच्या वेळी हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. सविता मेनकुदळे, कौशल्य विकास विभाग प्रमुख डॉ. संदीप किर्दत, डॉ. सादिक तांबोळी, डॉ. राजेंद्र भोसले व डॉ. भूपेंद्र निकाळजे हे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!