दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२३ | फलटण |
वाखरी (ता. फलटण) येथील छ. शिवाजी हायस्कूलची धोकादायक बनलेली इमारत केव्हाही जमीनदोस्त होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते. या इमारतीमुळे येथे शिकणार्या शालेय मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मात्र, याकडे ही शाळा चालविणारी श्रीराम एज्युकेशन सोसायटी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी तात्काळ संस्थेला आदेश काढावेत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती वाखरी ग्रामपंचायत येथे आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच सौ. शुभांगी तुकाराम शिंदे यांनी दिली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शुभांगी शिंदे यांनी सांगितले की, वाखरीतील हायस्कूल शाळेची सन १९६२ साली स्थापना झाली आहे. ती शाळा त्यावेळेस वाखरी ग्रामस्थांनी लोकवर्गणी व श्रमदान करून उभी केली. ही इमारत उभी करत असताना दगड, माती यामध्ये बांधण्यात आली. आता ही इमारत पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहे. इमारत कधी पडेल, हे सांगू शकत नाही. हे हायस्कूल श्रीराम एज्युकेशन सोसायटी या संस्थेकडे आहे. या संस्थेचे अध्यक्ष, सचिव व शाळेच्या मुख्याध्यापकांना वारंवार सांगून व बैठका घेऊन नवीन इमारत बांधण्यासाठी मागणी केली आहे. मात्र, ही संस्था याकडे दुर्लक्ष करीत आहे. गावातील मंदिर, समाज मंदिर व धोकादायक झालेल्या शाळेत विद्यार्थ्यांना बसविले जात आहे. ही शाळा कधी पडेल, हे सांगू शकत नाही. माळीण व इर्शाळवाडीसारखी दुर्घटना या शाळेबाबतीत घडू शकते. पंचक्रोशीत यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत विशेष ग्रामसभा घेऊन ठरावही करण्यात आले आहेत.
शाळेच्या इमारतीबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठी दुर्घटना घडेल. शाळा चालविणार्या संस्थाचालकांना आपण तातडीने आदेश करावेत. जर मोठी दुर्घटना घडली तर त्यास श्रीराम एज्युकेशन सोसायटीच सर्वस्वी जबाबदार राहील, असे सरपंच शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.