स्थैर्य, मुंबई, दि.४: ऑक्टोबरमध्ये घेण्यात
आलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र यांसह विविध व्यवसायिक
अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेला (सीईटी) बसू न शकलेल्या
विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शनिवारी (७ नोव्हेंबर) घेण्यात येणार आहे.
ऑक्टोबरमध्ये सीईटी घेण्यात आली. परीक्षेदरम्यान एक दिवस मुंबईत वीज गेली,
राज्याच्या अनेक भागांत पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. कोरोनाबाधित
विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत.
परीक्षेला नोंदणी करूनही बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा
घेण्याचे प्रवेश नियमन प्राधिकरणाने जाहीर केले होते. त्यानुसार
विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी राज्यातील
साधारण ४ हजार २०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. या विद्यार्थ्यांची
परीक्षा शनिवारी होणार आहे. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत भौतिकशास्त्र,
रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) या विषय गटाची तर दुपारी २.३० ते ५.३०
या वेळेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) या विषय गटाची परीक्षा
होणार आहे. परीक्षेबाबतची अधिक माहिती आणि प्रवेशपत्रे प्राधिकरणाच्या
संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.