स्थैर्य, पांचगणी, दि. 1 : सारी बाधित रुग्णाचे आज येथे निधन झाले तर कोरोना रुग्णांनी महाबळेश्वर तालुक्यात शंभरी पार केली. दरम्यान, शनिवारी येथील मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील यांनी महाबळेश्वर शहरात फेरफटका मारून पाहणी केली तर तहसीलदार सुषमा पाटील यांनी प्रतिबंधित क्षेत्र गोडवलीची पाहणी केली.
महाबळेश्वरपासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या गादळवाडी भागातील एका व्यक्तीचे सारीने निधन झाले. या व्यक्तीला सारीच्या उपचारासाठी सातारा येथील रुग्णालयात नेण्यात आले होते; परंतु सातारा येथे उपचारापूर्वीच या व्यक्तीचे निधन झाले. पालिकेच्या पथकाच्या मदतीने या व्यक्तीवर काही मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला. महाबळेश्वर येथील रांजणवाडी व पाचगणी जवळील गोडवली या दोन्ही प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.
महाबळेश्वर तालुक्याने कोरोना रुग्णांची शंभरी पार केली आहे. गोडवली येथे कोरोनाचे 38 रुग्ण आहेत तर रांजणवाडी येथे 10 रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी 39 रुग्णांवर महाबळेश्वर व पाचगणी येथे उपचार सुरू आहेत तर आजअखेर 60 जण कोरोना मुक्त झाले आहेत. आजपर्यंत दोन व्यक्तींचे निधन झाले असून एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
अनलॉक 3 च्या पार्श्वभूमीवर आज पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील यांनी शहरात फेरफटका मारला. यावेळी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्याधिकार्यांनी सुभाष चौक, बाजारपेठ, गणेश पेठ, गवळी आळी, पालिका कर्मचारी सोसायटी आदी दाट लोकवस्तीच्या भागात पायी फिरून पाहणी केली.
तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी आज प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या गोडवली गावाला भेट दिली व तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी नारायण घोलप, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते.