स्थैर्य, चंद्रपूर दि. २६ : केंद्रीय पथकाने आज चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. पूर येऊन गेल्यानंतरच्या कालावधीत शासनाकडून पंचनामे पूर्ण झाले आहेत. आत्तापर्यंत 42 कोटींची मदत देण्यात आली. मात्र तरीही पायाभूत सुविधांमधील अनेक मोठी कामे अपूर्ण असून यासाठी आणखी मदतीची गरज असल्याची मागणी नागरिकांनी पथकापुढे आज केली.
दि.30,31 ऑगस्ट व एक सप्टेंबर या कालावधीत वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गोसेखुर्दचे 33 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे ब्रम्हपुरी, मुल, सावली, गोंडपिंपरी, सिंदेवाही या 5 तालुक्यांमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. यासाठी तातडीने पंचनामे करून राज्य शासनाने आतापर्यंत 42 कोटी कोटींची मदत मंजूर केली. त्यापैकी 36 कोटी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. राज्य शासनाने या पुरामध्ये झालेल्या जीवितहानी, पशुधनाचे नुकसान, पूरग्रस्त भागामधील पुनर्वसन, तात्पुरता निवारा, कृषी मालाचे नुकसान, पुरानंतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, दुकानदारांना मदत अशा अनेक घटकांमध्ये आतापर्यंत 36 कोटीचे वाटप केले आहे. उर्वरित 6 कोटी रुपयांचे वितरण लवकरच करण्यात येत आहे.
केंद्रीय पथकाची भेट
ब्रम्हपुरी तालुक्यात राज्य शासनाने केलेले पंचनामे, त्यानंतर केलेली मदत, पायाभूत सुविधांमध्ये झालेले नुकसान, त्यामध्ये करण्यात आलेली दुरूस्ती, आणखी पुढे लागणारी मदत या संदर्भात आज केंद्रीय पथकाने भेट देऊन पाहणी केली. यापूर्वी 11 ते 13 सप्टेंबर या कालावधीत पथकाने भेट दिली होती. आजच्या दुसऱ्या पाहणी पथकामध्ये पथक प्रमुख राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली चे सह सचिव रमेश कुमार घंटा, तसेच नवी दिल्ली येथील केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे उप सचिव यश पाल, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे आर.बी.कौल, कृषी विभाग नागपूरचे संचालक आर.पी. सिंग, नवी दिल्ली येथील रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास, जलशक्ती नागपूरचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा व विविध विभाग प्रमुख सहभागी झाले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी, पायाभूत सुविधा, रस्ते व पूल यांचे नुकसान याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने लाडज, पिंपळगाव, बेलगाव येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला. याशिवाय या पथकाने विविध ठिकाणी रस्त्यामध्ये थांबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. बोटीने प्रवास करत पथकाने लाडज येथील नुकसान झालेल्या शेताची व घरांची पाहणी केली. या ठिकाणी काही नागरिकांनी पडलेल्या घरांसाठी मदतीची मागणी केली. केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी यावेळी स्थानिक तलाठी यांच्याकडे याबाबत चौकशी केली. अतिक्रमणधारक, नोंदणी न केलेले पूरग्रस्त, बँकेचे स्वतःचे खाते नसलेले पूरग्रस्त व यादीमध्ये नाव नसलेल्या नागरिकांबाबत नोंदणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
केंद्रीय पथका समोर अनेकांनी आपल्या मागण्या सादर केल्या. त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. यापूर्वी पंचनामे केल्यानंतर याद्या ग्रामपंचायतीमध्ये सादर करण्याचे निर्देश दिले होते. पंचनामा केल्यानुसार नुकसान भरपाईबाबत तक्रारी असल्यास त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मदतीचे वाटप, पंचनामे आणि आणखी कोणत्या क्षेत्रांमध्ये मदतीची गरज आहे, यासाठीच केंद्रीय समितीचा हा पाहणी दौरा असल्याचे जिल्हाधिकारी गुल्हाणे यांनी सांगितले.
रस्ते व पुलाचे नुकसान
शेतकऱ्यांना कृषी संदर्भातील नुकसानीसाठी प्राथमिक मदत राज्य शासनामार्फत देण्यात आली आहे. मात्र पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची पाहणी देखील आज करण्यात आली. याशिवाय या दौऱ्यामध्ये पुरामुळे झालेल्या शेत नुकसानीबाबत विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील व मदत वाटपाबाबत उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, यांच्याकडून माहिती घेतली. प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर पूरग्रस्तांना मदतीत काही उणीव राहू नये याची चौकशी देखील त्यांनी यावेळी केली. हे पथक या पाहणीनंतर केंद्राला आपला अहवाल सादर करणार आहे.