
स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१३: चीन आणि पाकिस्तानसोबतच्या सीमावादादरम्यान केंद्र सरकारने भारतीय हवाई दलासाठी 83 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या (CCS) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही सर्व लढाऊ विमाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)बनवणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यांनी लिहिले की, “हा करार देशासाठी गेम चेंजर असल्याचे सिद्ध होईल. संरक्षण क्षेत्रात उत्पादन अधिक मजबूत होईल. HALने लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) 1 A तेजस फाइटर तयार करण्यासाठी नाशिक आणि बेंगळुरू येथे सेटअप तयार केला आहे.”
तेजस 60% स्वदेशी असेल
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ”LCA तेजसच्या MK1A व्हेरिएंटमध्ये 50% ऐवजी 60% स्वदेशी उपकरणे आणि तंत्रज्ञान वापरले जाईल. LCA तेजस भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील कणा होणार आहे. यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होईल.’
तेजसचे वैशिष्ट्य काय आहे?
> तेजस हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मिसाइल सोडू शकते.
> यामध्ये अँटीशिप मिसाइल, बॉम्ब आणि रॉकेट देखील ठेवता येते.
> तेजस 42% कार्बन फायबर, 43% अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण आणि टायटॅनियमपासून बनविलेले आहे.
> तेजस भारतात विकसित केलेले हलके आणि मल्टीरोल फायटर जेट आहे.
> हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) तेजस विकसित केले आहे.
> हवाई दलाबरोबर नौदलाच्या गरजा भागविण्यासाठी तेजसला तयार केले जात आहे.