कोकणाला केंद्र आणि राज्य सरकारने धोरण ठरवून मदत करावी : शरद पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, रत्नागिरी, दि. 9 : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे धोरण ठरवून मदत केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. ते सध्या कोकण दौर्‍यावर असून या दौर्‍यादरम्यान रत्नागिरी येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, राज्यात यापूर्वी अशी संकटे आली आहेत. कोकणातही अशाप्रकारचे संकट आले होते. मला जांभूळपाडा येथील आपत्ती आठवते. त्यावेळी राज्य आणि केंद्र सरकारने मदत देऊन तिथली गावे उभी केली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीही तिथे आले होते. यानंतर 2005 मध्ये नागोठण्यात झालेल्या अतिवृष्टीनंतरही मी कोकणाला भेट दिली. यावेळच्या चक्रीवादळात कोकणातील नारळ आणि सुपारीची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. नारळाची बाग उद्ध्वस्त झाली तर पीक येण्यासाठी 10 वर्ष लागतात. त्यामुळे हे दीर्घकालीन नुकसान ध्यानात घेतले पाहिजे. यापूर्वी राज्यात जालना, औरंगाबाद परिसरात मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यावेळी आम्ही चार ते पाच दिवसात केंद्र सरकारकडून मोसंबी बागायतदारांना प्रतिहेक्टरी 35 हजार रुपयांची मदत मिळवून दिली होती. त्यामुळे आताही कोकणासाठी केंद्र व राज्य सरकारने एकत्रितपणे धोरण ठरवून मदत केली पाहिजे.

याशिवाय, कोकणातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची गरज आहे. चक्रीवादळात वीज खात्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यासाठी आजूबाजूच्या चार ते पाच जिल्ह्यातील मनुष्यबळ कोकणात वळवून येथील वीजपुरवठा सुरळीत करायला हवा. या कामात मुंबईतील वीज कंपन्यांची मदत घेता येईल का, हेदेखील पाहायला हवे तसेच यापूर्वी लोकांना दिलेले अन्नधान्य भिजले असेल तर त्यांना परत धान्य द्यायला पाहिजे. यासाठी आपण अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क केला होता. ते लवकरच या संदर्भात निर्णय जाहीर करतील, असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवारांकडून नुकसानीची पाहणी, मदतीचे आश्‍वासन
तत्पूर्वी शरद पवार यांनी आज रायगडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आज त्यांनी म्हसळा, माणगाव, दिवेआगर आणि श्रीवर्धन येथील निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पडलेली घरे, प्रार्थना स्थळे, मशिदी, मंदिर, शेती, बागा आदींची पवारांनी पाहणी केली.

चक्रीवादळामुळे जे नुकसान झाले आहे ते खूप जास्त आहे. यावेळी दुहेरी संकट आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या अडीच महिन्यापासून व्यवहार ठप्प आहेत, व्यवसाय थांबले आहेत. राज्य सरकारच्या उत्पन्नावरही परिणाम झाला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, सरकारने आता मदत म्हणून केलेली मदत अंतिम नाही. पंचनामे झाल्यावर काय मदत द्यायची हे ठरेल. आधी राज्यात पाठपुरावा करू आणि आवश्यकता लागली तर दिल्लीत जाऊन देखील पाठपुरावा करू. लवकर पंचनामे झाले पाहिजेत. केंद्र सरकारची टीम येऊन पाहणी करणार असल्याचे मी ऐकले आहे. महाराष्ट्रावरचे हे संकट आहे, त्यामुळे यात पक्ष राजकारण बघू नये. सगळ्यांनी पुढे येऊन गरजू लोकांना मदत केली पाहिजे.

केंद्र सरकार आणि राज्याला सांगून मदत घ्यावी लागेल. छोटे व्यावसायिक अडचणीत आहेत. पाच ते सहा दिवसाच्या आत वीज पुरवठा सुरळीत करणे आवश्यक आहे. टाटा, रिलायन्स, अदानी यांच्याशी संपर्क साधून त्यांची टीम या ठिकाणी आली तर मदत होईल. अदानीमधून काहीजण मदतीला आले, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!